सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसट यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर एका महिलेने फसवणूक, ब्लॅकमेलिंग, शारीरिक आणि मानसिक छळ यांसारखे आरोप लावले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र आता संबंधित महिलेने आरोप मागे घेतले आहेत. हे आपलं घरघुती प्रकरण असल्याचं सांगून याचं कोणीही राजकारण करू नये, असं या महिलेने म्हटले आहे.
काय म्हणाली ती महिला?
महिलने आरोप मागे घेताना हे आपलं घरघुती प्रकरण असल्याचं स्पष्ट केलं. या प्रकरणी विरोधी पक्षांनी राजकारण करू नये असंही ती महिला म्हणाली. ती महिला म्हणाली की, संजय शिरसाट यांचा मी सन्मान करते. सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले मी आरोप मागे घेते. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन कुणीही राजकारण करू नये. या प्रकरणाला मी फुल स्टॉप देत आहे. माझ्या खांद्यावर बंदुक ठेऊन कुणीही राजकारण करू नये. सोशल मीडियावर किंवा माझ्या नावाने कोणीही राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार असा इशारा या महिलेने केला. मी शिरसाट साहेबांचा सन्मान करतेय. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. त्यांनी कधीही फोन केला नाही असं ती महिला म्हणाली. हे प्रकरण मला संपवायचं आहे, मला यात गुंतून न पडता पुढे जायचं आहे असं ती महिला म्हणाली.
काय केले होते आरोप?
संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार, २०१८ मध्ये सोशल मीडियाद्वारे तिची सिद्धांतशी ओळख झाली. त्यानंतर दोघांनी चेंबूरमधील एका फ्लॅटमध्ये शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने आरोप केला आहे की सिद्धांतने तिला वारंवार आत्महत्येची धमकी दिली आणि भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल केले आणि लग्नासाठी दबाव आणला. सिद्धांतच्या भावनिक आश्वासनांना बळी पडून तिने त्याच्याशी लग्न केले आणि नंतर ती गर्भवती राहिली. पण सिद्धांतने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. संजय शिरसाट मंत्री असल्याने आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याने पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्याविरोधात महिलेने 20 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांचे वडिल राजकीय नेते असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे कारवाई झाली नाही, असा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आलाय. सात दिवसांच्या आत महिलेला नांदवण्यासाठी घेऊन जावे, अन्यथा अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं वकील चंद्रकांत ठोंबर यांच्या कायदेशीर नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय. मात्र काही तासानंतर या महिलेने यूटर्न घेत आरोप मागे घेतले आहेत.
Leave a Reply