सांगली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव सेनेत प्रवेश केलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदेच्या सेनेत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे तेच चंद्रहार पाटील आहेत ज्यांना महाविकास आघाडीत बिघाडी करून सांगली लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आता ते शिंदेंच्या सेनेच्या वाटेवर असल्याचं कळतंय. त्यामुळे उबाठा सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकीकडे नाशिकमध्ये दोनच दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते, त्यानंतर त्यांनी आपली नाराजी देखील बोलून दाखवली होती. आज शिवसेना ठाकरे गटाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे, सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. आता चंद्रहार पाटील सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचं कळतंय.
हिंमत असेल तर प्रवेश रोखून दाखवा : संजय शिरसाट
संजय शिरसाट यांनी बुधवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली. चंद्रहार पाटील हे
सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरेंमध्ये हिमत असेल तर त्यांनी हा पक्षप्रवेश रोखून दाखवावा. सद्यस्थितीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षात लक्ष घातले पाहिजे. चालू महिन्याच्या अखेरपर्यत अनेक नेते आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, असे ते म्हणाले.
चंद्रहार पाटलांनी घेतली होती एकनाथ शिंदेंची भेट
उल्लेखनीय बाब म्हणजे चंद्रहार पाटील यांनी 26 एप्रिल रोजी कुडाळ येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मंत्री उदय सामंत याच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची चर्चा होती, तेव्हापासूनच ते शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाली होती.
त्यानंतर त्यांनी उदय सामंत यांचीही भेट घेतली होती. यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेने अधिकच जोर धरला होता. पण त्यांनी मी काही कामानिमित्त सामंत यांची भेट घेतल्याची बतावणी चंद्रहार यांनी केली होती. पण आता अखेर त्यांच्या शिवसेना प्रवशाची तारीख ठरली आहे.
Leave a Reply