जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा ई-बुक स्वरूपात आणणार – उदय सामंत

आळंदी : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील सर्व अभंग महाराष्ट्र शासन ई-बुक आणि ऑडिओ स्वरूपात आणणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आळंदी येथे दिली. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवस्थानच्या जागेच्या विकास आराखड्यासाठी शासन निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ परिवाराने विद्यार्थ्यांच्या मूल्यसंवर्धनासाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ आणि ‘परिचय भागवत धर्माचा’ या दोन पुस्तकांची निर्मिती केली आहे. या पुस्तकांचे प्रकाशन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्ञानेश्वरीच्या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या मूल्य शिक्षणात समाविष्ट करण्याचा विचार असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात राज्य शासनातर्फे त्रिदिनी कीर्तन महोत्सव आळंदीत आयोजित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखने, माजी विश्वस्त अभय टिळक, डॉ. नारायण महाराज जाधव, नरहरी चौधरी, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. विष्णू तापकीर, सुभाष महाराज गेठे, भागवत महाराज साळुंके, शेवाळे महाराज, उमेश महाराज बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *