कोकणावर अपार प्रेम असल्याचा दावा करणारे उद्धव ठाकरे यांचं प्रेम केवळ ढोंगी आणि दिखाऊ असल्याचा घणाघात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.केसरकर म्हणाले, “मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काजू बोर्डाच्या धोरणावर समिती स्थापन झाली होती, मी स्वतः त्या समितीचा अध्यक्ष होतो. हे धोरण कोकणाचा कायापालट करणारे ठरले असते. पण ठाकरे यांनी त्या धोरणाला मंजुरीच दिली नाही. त्यांच्या कार्यकाळात कोकणासाठी कोणतीही ठोस कृती झाली नाही, यावरूनच त्यांच्या कोकणप्रेमाची खोली लक्षात येते.”
‘चांदा ते बांदा’ योजनेचंही उदाहरण देत केसरकर म्हणाले, “अर्थ खात्याने बंद केलेली ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांचा आदेश आवश्यक होता. पण त्यांनी त्यावर एक शब्दही काढला नाही. कोकणाच्या विकासासाठी त्यांनी काहीच केलेलं नाही.”
उद्धव ठाकरे हे केवळ एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यासाठी कोकणाचा उल्लेख करतात, असं म्हणत केसरकरांनी टोला लगावला. “उलट शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी काजू बोर्डासाठी थेट १५०० कोटींचा निधी मंजूर केला. काजू बोंडावर आधारित उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न झाला असून, तो यशस्वी झाला तर कोकणातील शेतकऱ्यांना ३००० कोटींचा फायदा होणार आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.
कोकण किनारपट्टी शिंदे यांच्या पाठीशी – केसरकरांचा दावा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधून स्पष्ट झालं आहे की कोकणी जनतेचा कल बाळासाहेबांच्या विचारांप्रमाणे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाच्या बाजूने आहे,” असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. कोकणातील प्रकल्पांना उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून विरोध झाल्यामुळे हजारो कोकणी तरुण रोजगारापासून वंचित राहिले, असंही ते म्हणाले. “कोकणाच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्यांना कोकणी जनता आता सोबत घेणार नाही,” असा इशारा त्यांनी अखेरीस दिला.
Leave a Reply