अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीने तीव्र राजकीय वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज १८ नोव्हेंबर रोजी तहसील प्रशासनाने बाद ठरवला. या निर्णयानंतर थिटे यांनी तो निर्णय न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका घेतली असून, “अर्ज कसा बाद झाला याची चौकशी मागवणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.
थिटे यांनी यापूर्वी माजी आमदार व भाजप नेते राजन पाटील यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप करत १७ नोव्हेंबरला पोलीस संरक्षणात अर्ज भरला होता. मात्र, छाननीदरम्यान काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने अर्ज बाद केल्याचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी सांगितले. “अर्जावर सूचकाची सही नव्हती, प्रभाग क्रमांक आणि मतदार यादीतील क्रमांक चुकीचे होते,” अशी माहिती त्यांनी दिली.
मात्र, थिटे यांनी सूचकाची सही अचानक गायब कशी झाली, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला. “चार–पाच दिवसांच्या संघर्षानंतर कागदपत्रं मिळाली. प्रत्येक कागदावर सूचकाची सही होती. मग सही गायब कशी?” असा सवाल त्यांनी केला.
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजप नेते राजन पाटील यांनी १७ पैकी १७ उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या सूनबाईंना उमेदवारी मिळाल्यानंतर थिटेंच्या अर्जात अडथळे आणल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, राजन पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, “आम्ही बाहेर येतो म्हणून आम्ही गुंड वाटतो,” अशी प्रतिक्रिया दिली.
थिटे या बाहेरून येऊन राजकारण करत असल्याचा पाटील यांनी केलेला आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी खोडून काढला. “अनगर त्यांचं मूळ गाव आहे. त्या इथल्याच मतदार आहेत. नवरा गेल्यानंतरही त्या इथेच शेती करत राहिल्या,” असे ते म्हणाले.
या सर्व घटनांमुळे ‘बिनविरोध निवडणूक’ हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोकशाहीच्या दृष्टीने या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर म्हणाले, “ही परंपरेच्या नावाखाली होणारी गुंडगिरी आहे. अशा पद्धती लोकशाहीसाठी घातक आहेत, त्यामुळे कायद्याने कठोर कारवाई व्हायला हवी.” अनगरमधील ही राजकीय उत्कंठा वाढत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.


Leave a Reply