बेरोजगारीचा आणि कामाचा ताण वाढला, २०२३ मध्ये दररोज सरासरी १३ जणांनी आयुष्य संपवले

बंगळुरू : देशात बेरोजगारी आणि कामाच्या ताणामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (NCRB) च्या अहवालातून समोर आले आहे. २०२३ मध्ये दररोज सरासरी १३ जणांनी आत्महत्या केली — आठ बेरोजगारीमुळे तर पाच कामाशी संबंधित कारणांमुळे. या दोन्ही कारणांमुळे वर्षभरात तब्बल ४,९९१ जणांनी आपला जीव गमावला.

२०१९ ते २०२३ या कालावधीत अशा स्वरूपाच्या तब्बल २६,००० आत्महत्यांची नोंद झाली आहे. या आकडेवारीतून आर्थिक अस्थिरता आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम स्पष्ट दिसतो. कोविड-१९ नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या गेल्या, पगारकपात झाली आणि पुनरुज्जीवनाची प्रक्रिया संथ राहिली.

२०१९ मध्ये बेरोजगारीमुळे झालेल्या आत्महत्या २,८५१ इतक्या होत्या. त्या २०२१ मध्ये ३,५४१ वर पोहोचल्या. त्याच वेळी करिअरशी संबंधित आत्महत्याही दोन वर्षांत तब्बल ५६ टक्क्यांनी वाढल्या. २०२३ मध्ये थोडी घट झाली असली तरी आत्महत्यांचे प्रमाण महामारीपूर्व काळापेक्षा अजूनही जास्त आहे.

मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नोकरीतील असुरक्षितता, वाढते कर्ज, आर्थिक अडचणी आणि सामाजिक प्रतिष्ठेचा दबाव हे घटक आत्महत्यांच्या मागे आहेत. पुरुषांमध्ये या आत्महत्यांचे प्रमाण जास्त असले तरी महिलांमध्येही करिअर-संबंधित प्रकरणांची वाढ होत आहे.

दरम्यान, देशातील एकूण आत्महत्यांची संख्या २०१९ मधील जवळपास १.४ लाखांवरून २०२३ मध्ये १.७ लाखांवर गेली आहे — म्हणजेच २३ टक्क्यांची वाढ. त्यापैकी ‘कौटुंबिक समस्या’ हे अजूनही सर्वाधिक आत्महत्यांचे प्रमुख कारण ठरले असून दरवर्षी जवळपास एकतृतीयांश मृत्यू या श्रेणीत मोडतात.

तज्ज्ञांचे मत आहे की, रोजगारनिर्मितीसह मानसिक आरोग्यसेवा, कार्यस्थळी ताण कमी करणारी धोरणे आणि समुपदेशन व्यवस्था मजबूत केल्यास हा चिंताजनक कल थांबवता येऊ शकतो.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *