भारताच्या डिजिटल पेमेंट क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत अभूतपूर्व वाढ नोंदवली आहे. या कालावधीत UPI व्यवहारांचे प्रमाण ४२ टक्क्यांनी वाढून ९३.२३ अब्जवर पोहोचले. ‘वर्ल्डलाइन इंडिया डिजिटल पेमेंट्स रिपोर्ट (2H 2024)’ नुसार, डिजिटल व्यवहारांमध्ये UPI चे वर्चस्व कायम असून, PhonePe, Google Pay आणि Paytm या अॅप्सनी आघाडी घेतली आहे. डिसेंबर २०२४ अखेर PhonePe, Google Pay आणि Paytm या तिन्ही अॅप्सचा UPI व्यवहारांमध्ये एकत्रित वाटा ९३ टक्के (संख्येच्या दृष्टीने) आणि ९२ टक्के (मूल्याच्या दृष्टीने) होता. या कंपन्यांचे डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातील वर्चस्व यातून स्पष्ट होते.
२०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत झालेल्या ६५.७७ अब्ज UPI व्यवहारांची संख्या २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत ४२ टक्क्यांनी वाढून ९३.२३ अब्ज वर पोहोचली. याच कालावधीत, UPI व्यवहारांचे एकूण मूल्य ३१ टक्क्यांनी वाढून ९९.६८ ट्रिलियन रुपयांवरून १३०.१९ ट्रिलियन रुपये झाले आहे.
UPI व्यवहार मुख्यतः दोन प्रकारांमध्ये विभागले जातात – व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) आणि व्यक्ती-ते-व्यापारी (P2M).
• P2P व्यवहार: २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत २७.०४ अब्ज होते, ते २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत ३० टक्क्यांनी वाढून ३५.२१ अब्ज झाले. तसेच, एकूण P2P व्यवहारांच्या मूल्यामध्येही २६ टक्क्यांची वाढ झाली.
• P2M व्यवहार: या व्यवहारांमध्ये ५० टक्क्यांची मोठी वाढ झाली असून, २०२३ मध्ये ३८.७३ अब्ज असलेले व्यवहार २०२४ मध्ये ५८.०३ अब्ज वर पोहोचले. P2M व्यवहारांच्या एकूण मूल्यामध्येही ४३ टक्के वाढ झाली आहे.
भारतात डिजिटल पेमेंटचा वेगाने विस्तार होत आहे. यामागे UPI चा वाढता वापर, POS यंत्रणांचा विकास आणि मोबाइल व्यवहारांची वाढती लोकप्रियता कारणीभूत आहेत. विशेषतः SoftPOS तंत्रज्ञानामुळे व्यापाऱ्यांसाठी डिजिटल व्यवहार अधिक सोपे झाले आहेत.
२०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत UPI व्यवहारांचा सरासरी तिकीट आकार (ATS) १,३९६ रुपये होता. २०२३ च्या याच कालावधीत तो १,५१५ रुपये होता, म्हणजेच त्यात ८ टक्क्यांची घट झाली आहे. UPI व्यवहारांतील ही वाढ भारतातील डिजिटल आर्थिक व्यवस्थेतील परिवर्तनाचे द्योतक आहे. भविष्यातही UPI व्यवहारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, डिजिटल पेमेंट्समध्ये नव्या तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Leave a Reply