सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या आठवड्याभरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. उत्तर तालुक्यातील रानमसले, दारफळ गावडी,वडाळा,नान्नज, बीबीदारफळ, कळमण,कौठळी, पडसाळी भागातील ओढे – नाले दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान,बहुतांश शेतकऱ्यांची मशागतीची कामे अद्याप बाकी आहेत.कित्येक वर्षाच्या खंडानंतर यंदा प्रथमच मे महिन्याच्या मध्यापासूनच अवकाळी पावसाने जोर धरल्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे.अवकाळी नंतर मागोमाग मान्सूनही दाखल होत असल्यामुळे यंदा पेरणीसाठी उसंत मिळेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे ओढे बंधारे तुडुंब भरले आहेत.ओढ्या लगतच्या विहिरीत पाणीसाठा वाढला आहे. मात्र यात मोठ्याप्रमाणात नुकसान देखील झाले आहे. १ ते २२ मे या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात ११६ मिमी पावसाची नोंद आली आहे. या मान्सूनपूर्व पावसाने सोलापूर जिल्ह्यातील 142 गावात नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या अहवालात समोर आले आहे.
यामध्ये दुर्दैवी वीज पडून दोन व्यक्तींचा तर 57 जनावरांचा मृत्यू झालाय. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालनुसार में महिन्यात एकूण 80 घरांची पडझड झाली असून 630 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. 6 मे रोजी माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील करिष्मा विकास तांबवे यांचा तर 19 मे रोजी माढा तालुक्यातील बाळासाहेब माणिक पाटील यांचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला. 1 ते 22 मे दरम्यान पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि वीज पडल्याने जिल्ह्यातील 14 लहान तर 43 मोठे अशा एकूण 57 पशुधन दगावले. याशिवाय 80 घरांची अंशतः पडझड झाली. तसेच 1557 शेतकऱ्यांचे 630 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, आंबा यासारख्या पिकांचे नुकसान झाले. दरम्यान ही प्राथमिक अहवालतील माहिती असून नुकसानीचे पंचनामे करुन तत्काळ संबंधितांना मदत मिळवून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Leave a Reply