रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची संपत्ती गेल्या वर्षभरात तब्बल १ लाख कोटी रुपयांनी घटली, यामुळे ते जागतिक टॉप-१० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. मात्र, ते अद्यापही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कायम आहेत. याच्या उलट, गौतम अदानी यांच्या संपत्तीत तितकीच म्हणजे १ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे, असे ‘हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५’ अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
अंबानींच्या संपत्तीत घसरण का?
रिलायन्स समूहातील कंपन्यांवरील कर्जाचा वाढता भार,ऊर्जा आणि किरकोळ विक्री व्यवसायातील मंदी,कंपन्यांच्या समभागांच्या किंमतीत घट. या कारणांमुळे अंबानींच्या एकूण संपत्तीत मोठी घट झाली. दुसरीकडे, अदानी समूहाच्या संपत्तीत १३% वाढ होऊन ती ८.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
एलॉन मस्क अजूनही अव्वल स्थानी
टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यांची संपत्ती ८२% वाढून तब्बल ४२० अब्ज डॉलर (सुमारे ३४.८ लाख कोटी रुपये) झाली आहे.
आशियातील अब्जाधीशांची राजधानी म्हणून शांघायने मुंबईला मागे टाकले असले तरी, ९० नावांसह मुंबई भारतातील अब्जाधीशांचे केंद्र राहिले आहे. शांघायमध्ये आता ९२ अब्जाधीश आहेत, तर बीजिंगमध्ये ९१ अब्जाधीश आहेत. मुंबईत ११ नवीन अब्जाधीशांची भर पडली, जे लंडन (७) आणि बीजिंग (८) पेक्षा जास्त आहेत.
भारतीय श्रीमंतांचा दबदबा – जगात तिसरे स्थान
जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत २८४ भारतीयांचा समावेश असून, भारत हा सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
• भारतातील अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती ९८ लाख कोटी रुपये आहे.
• ही संपत्ती भारतातील एकूण GDP च्या तृतीयांश एवढी आणि सौदी अरेबियाच्या पूर्ण GDP पेक्षा अधिक आहे.
• यंदा १३ नवीन भारतीय अब्जाधीश तयार झाले.
• १७५ जणांची संपत्ती वाढली, तर १०९ जणांची घटली किंवा स्थिर राहिली.
रोशनी नाडर जगातील पाचव्या श्रीमंत महिला
एचसीएल टेकच्या रोशनी नाडर आणि त्यांच्या कुटुंबाने ३.५ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह जगातील पाचव्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यांच्या वडिलांकडून ४७% हिस्सा हस्तांतरण झाल्यानंतर त्या जगातील टॉप-१० महिला अब्जाधीशांमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.
भारतीय अब्जाधीशांची संपत्ती
1. मुकेश अंबानी (रिलायन्स) – ८.६ लाख कोटी
2. गौतम अदानी (अदानी समूह) – ८.४ लाख कोटी
3. रोशनी नाडर (एचसीएल टेक) – ३.५ लाख कोटी
4. दिलीप संघवी (सन फार्मा) – २.५ लाख कोटी
5. अझीम प्रेमजी (विप्रो) – २.२ लाख कोटी
6. कुमार मंगलम बिर्ला (आदित्य बिर्ला समूह) – २ लाख कोटी
7. सायरस पूनावाला (सीरम इन्स्टिट्यूट) – २ लाख कोटी
8. नीरज बजाज (बजाज ऑटो) – १.६ लाख कोटी
9. रवी जयपुरिया (आरजे कॉर्प) – १.४ लाख कोटी
10. राधाकिशन दमानी (ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स) – १.४ लाख कोटी
जगभरातील अब्जाधीशांची संख्या
a). अमेरिका – ८७०
b). चीन – ८२३
c). भारत – २८४
Leave a Reply