मुंबई: महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी अभूतपूर्व गदारोळ झाला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत तातडीने या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली, मात्र ती फेटाळल्याने संतप्त विरोधी पक्षांनी सभात्याग केला. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “शेतकऱ्यांना भिकारी संबोधले जात आहे, तर काही माजी मंत्री आक्षेपार्ह विधाने करत आहेत,” असे ते म्हणाले. शेतमालाला हमीभाव मिळत नसून, निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन सरकार विसरले असल्याचा आरोपही त्यांनी केला. “बैल नसल्याने शेतकऱ्याला स्वतःला नांगराला जुंपून घेण्याची वेळ आली आहे,” असे हृदयद्रावक वास्तव त्यांनी मांडले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि ते ती पार पाडतील. मात्र, विरोधकांनी या प्रश्नावरून राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
तत्काळ चर्चेची मागणी फेटाळल्याने विरोधक आक्रमक झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना प्रस्ताव आणल्यास चर्चेसाठी पूर्ण दिवस देण्याची तयारी दर्शवली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले.
असे असूनही, तत्काळ चर्चा न झाल्याने काँग्रेस, उद्धवसेनेच्या आमदारांनी सभात्याग करत आपला निषेध नोंदवला. उद्धवसेनेच्या भास्कर जाधव यांनीही शेतकरी आत्महत्यांवर सरकारने तातडीने चर्चा घडवून आणण्याची मागणी केली.
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना आपण शेतकऱ्यांच्या विरोधात कधीही बोललो नसून काही लोक राजकारण करत असल्याचा आरोप केला. “माझ्या मृत्यूनंतरही माझी हाडेसुद्धा म्हणतील मी शेतकरी आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.


Leave a Reply