आज मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. कारण आजच्याच दिवशी, १९३ वर्षांपूर्वी मराठीतील पाहिले दैनिक “दर्पण” सुरू झाले होते. त्याच दिवशी ” वैश्य मानस” या लोकप्रिय नियतकालिकाचे संपादक रमेश वारंगे यांचा ७५ वा वाढदिवस असणे हा खरोखर अमृतयोग आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय, अथकपणे समाजसेवा करणाऱ्या श्री वारंगे या ध्येयनिष्ट समाजश्रेष्ठीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ज्या काळात सोशल मीडियाचा जन्म झाला नव्हता. मोठ्या वर्तमानपत्रात छोट्या बातम्यांना स्थान मिळत नसे. त्याकाळात वैश्य समाजातील अडी-अडचणी, सुखदुःख, समाजबांधवांच्या व्यथा, त्यांच्या गरजा आणि मुख्य म्हणजे त्यांचे मनोगत, मांडण्यासाठी वारंगे यांनी “वैश्यमानस” हे व्यासपिठ निर्माण झाले.
कुठल्याही संस्थेची एका पैशाची आर्थिक मदत नसताना, केवळ जिद्दीच्या जोरावर एखादे नियतकालिक कसे चालविले जाऊ शकते, याचे उदाहरणच वैश्य मानसच्या अस्तित्वातून रमेश वारंगे यांनी समाजापुढे आणले. त्यासाठी त्यांनी किती खस्ता खाल्ल्या असतील याची कल्पना करवत नाही. पण “आकांक्षा पुढती गगन ठेंगणे” म्हणतात, त्या ऊर्जेने, वारंगे यांनी आपल्या नियतकालिकाच्या प्रकाशनाची व्याप्ती महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता बेळगांव, गोवा, कर्नाटक पर्यंत नेली. सभासद संख्या पहिल्या तिमाहीत पंचवीस, दुसऱ्या तिमाहीत आणखी पंचविस, अशी हळूहळू सभासद संख्या वाढू लागली. अनेक सामाजिक संस्थांशी संपर्क वाढू लागला.
स्वतःचा व्यवसाय सांभाळून वारंगे यांनी सहकाऱ्यांबरोबर गावोगावचे दौरे सुरू केले. सभासद संख्या हवी तशी वाढत नसली तरी, समाज बांधवांत उत्कंठा व वाचनाची ओढ निर्माण झाली. एका गावात वा एखाद्या संस्थेत पोहोचलेला अंक सार्वत्रिक स्वरूपात बांधवांसमोर वाचला जावू लागला. घरोघरी “वैश्यमानस” हे नाव पोहचले. पुढे माहितीचा ओघ वाढला. नवनवीन लोक जोडले जाऊ लागले. त्यातून महाराष्ट्र, गोवा बेळगांव या ठिकाणच्या ४० पेक्षा अधिक संस्थांची माहिती, बातम्या प्रकाशित होऊ लागल्या.
यातून एक फार मोठी कामगिरी साधली गेली, ती म्हणजे, अनेक पोटजातीत विखुरलेला वैश्यसमाज वैश्यमानसच्या माध्यमातून एकत्र येऊ लागला. विविध पोटजातीत सोयरेसंबंध नव्याने निर्माण झाले. त्यामुळे अनेकांचे व्यक्तिगत, व्यावसायिक आणि राजकीय फायदे सुद्धा झाले. काही ज्येष्ठ व जिद्दी मंडळींनी त्याही पुढे जाऊन,वैश्यवाणी महासंघ स्थापन केला. वैश्यमानसने त्यास पूर्ण पाठिंबा देऊन अमाप प्रसिध्दी दिली.
समाजात होत असलेल्या उपक्रमांना प्रसिध्दी मिळू लागली. विविध कार्यक्रम-वधुवर मेळावे या माध्यमातून समाज संस्थांचे अनेक उपक्रम समाजापूढे येऊ लागले… हे सगळं घडलं, एका ध्येयासक्त संपादकांमुळे. रमेश वारंगे यांच्यामुळे. आजही वयाच्या पंच्याहत्तरीत ते तरुणाच्या तडफेने कार्यरत आहेत. त्यांच्या शंभरीनिमित्त सुद्धा मला त्यांच्यावर असाच प्रदीर्घ लेख लिहायचा आहे. त्यासाठी त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
महेश म्हात्रे
संपादक – संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर
Leave a Reply