मुंबई १९७४-७५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर रणजी करंडकाचा पहिला सामना खेळलेल्या बॉम्बे संघाचा बुधवारी सन्मान करण्यात आला. या संघातील सदस्यांना त्यावेळेस सामन्याच्या मानधन म्हणून केवळ शंभर रुपये मिळाले होते. मात्र, सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा भाग म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) या खेळाडूंना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे बक्षीस दिले. या कार्यक्रमात ८४ वर्षीय पद्माकर शिवलकर, ७९ वर्षीय वेगवान गोलंदाज अब्दुल इस्माईल, ७९ वर्षीय अजित पै, ७५ वर्षीय अष्टपैलू मिलिंद रेगे आणि ७३ वर्षीय करसन घावरी यांचा सत्कार करण्यात आला. हे सर्वजण १८ नोव्हेंबर १९७४ रोजी बडोद्याला एक डाव आणि ९६ धावांनी पराभूत करणाऱ्या ऐतिहासिक संघाचा भाग होते. गवताळ खेळपट्टीवर खेळलेल्या त्या सामन्याची आठवण या दिग्गजांनी या प्रसंगी सांगितली.
वानखेडेवरील पहिला रणजी सामना – एक संस्मरणीय क्षण: “वानखेडेवर रणजी करंडकाचा पहिला सामना खेळण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. आम्ही बडोद्याला सहज हरवले. त्या वेळी बॉम्बे संघात खेळणे आणि या मैदानावर वेळ घालवणे हा एक उत्तम अनुभव होता. आम्ही एकमेकांसोबत कुटुंबासारखे होतो,” असे अब्दुल इस्माईल यांनी सांगितले. त्यांनी त्या सामन्यात नाबाद २५ धावा केल्या आणि सात विकेट्स घेतल्या.
मिलिंद रेगेसाठीही हा सामना खास होता. त्यांनी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत ६३ धावा केल्या होत्या. “आज मला माझ्या घरी परतल्यासारखे वाटत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एकमेव संघटना आहे, जी आपल्या माजी क्रिकेटपटूंना सन्मान देते. आम्हाला या सुवर्णक्षणांत सामील होण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञ आहे,” असे रेगे म्हणाले.
करसन घावरी यांचे अष्टपैलू कौशल्य:
करसन घावरी यांनी आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत ८३ धावा केल्या आणि सामन्यात सात विकेट्स घेतल्या. त्यांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले, “वानखेडेवरचा हा पहिलाच प्रथम श्रेणी सामना होता, त्यामुळे हा सामना नेहमी लक्षात राहील. ५० वर्षांनंतरही एमसीएने आमची आठवण ठेवली, ही त्यांच्या खेळावरील निष्ठेची पावती आहे. बक्षीस रक्कम गौण आहे; परंतु आम्हाला सन्मानित करण्यासाठी केलेला हा प्रयत्नच खरा मोठा पुरस्कार आहे.”
या सामन्यात करसन घावरी यांनी आपली १००वी प्रथम श्रेणी विकेट घेतली होती. त्यापूर्वी ते सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत होते. एमसीएकडून खेळाडू आणि कर्मचाऱ्यांचा गौरव: या कार्यक्रमात एमसीएने केवळ माजी खेळाडूंचाच नव्हे, तर आपल्या माजी व्यवस्थापकीय समिती सदस्य आणि ग्राउंड्समन यांचाही सन्मान केला. वानखेडेवरील पहिल्या कसोटीत खेळलेले आणि आता ब्रिटनमध्ये स्थायिक असलेले फारोख इंजिनीअर या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी संदेश पाठवून आपले विचार व्यक्त केले. “१९७४-७५ च्या संघातील सदस्यांचा सन्मान होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. मी या सोहळ्यात सहभागी होऊ शकलो नाही याची खंत आहे, परंतु मला कळले की खेळाडूंना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात आले, हा खरोखरच मोठा सन्मान आहे,” असे त्यांनी म्हटले.
या संघातील अन्य सदस्य राकेश टंडन अमेरिकेत आहेत, तर सुनील गावस्कर शहराबाहेर असल्याचे समजते. कर्णधार अशोक मांकड, सुधीर नाईक आणि एकनाथ सोलकर यांचे निधन झाले आहे. वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने केलेला हा सन्मान मुंबईच्या क्रिकेट इतिहासात कायम स्मरणीय ठरेल.
Leave a Reply