ठाणे: आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गटात शाब्दिक युद्ध पेटले आहे. माजी खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाचे माजी खासदार नरेश म्हस्के यांना ‘संसद रत्न’ पुरस्काराऐवजी ‘वाचाळ रत्न पुरस्कार’ द्यायला हवा, अशी बोचरी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हस्के यांनी विचारे यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचे म्हटले आहे. या वादाची सुरुवात कोपरी पुलाच्या कामावरून झाली. कोपरी पुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, म्हस्के यांना खासदार म्हणून केलेल्या कामाची माहिती असणे गरजेचे आहे. कोपरी पुलाच्या दुरुस्तीला २०१८ साली परवानगी मिळाली होती आणि त्यासाठी आपण पाठपुरावा केला होता. मात्र, हे काम तीन वर्षे रेंगाळले. आता काम सुरू झाले असले तरी, सध्याचे खासदार पाठपुरावा करत नाहीत आणि केवळ बडबड करतात, अशी टीका विचारे यांनी केली.
या टीकेला नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर सडेतोड उत्तर दिले. त्यांनी राजन विचारे यांना ‘राजन आजोबा’ संबोधत म्हटले की, “मी अजून बच्चा आहे आणि मोठा होत आहे. तुम्ही लोकसभा पटलावर गेल्यापासून थकलेलेच आहात. तुम्ही पोळीवर नाकं केले, ते सर्वांच्या लक्षात आहे. ना तुम्ही कधी प्रश्न विचारले, ना ठाणेकरांच्या समस्या संसदेत मांडल्या. त्यामुळे संसद रत्न काय भानगड आहे, हे तुम्हाला कळणार नाही.” पुढे म्हस्के यांनी विचारे यांच्या राजकीय कारकिर्दीवरही निशाणा साधला. “तुम्ही लोकसभा निवडणूक हरलात, विधानसभेत तुम्हाला गाशा गुंडाळावा लागला. आता महापालिकेतही तुम्हाला उभे राहावे लागेल. चांगले आहे, माणसाने प्रगतीवादी असले पाहिजे,” अशी खिल्ली त्यांनी उडवली. महापालिका निवडणुकीत हातातून फक्त भोपळा लागला, तर तुमचं मानसिक अवस्था वाईट होईल, ‘आजोबा,’ असेही त्यांनी खोचकपणे म्हटले आहे. या शाब्दिक चकमकीमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply