अमेरिकन व्हिसा मिळवून देण्याच्या बहाण्याने मुंबईतील महिला डॉक्टरला २ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश अनवधानाने झालेल्या व्हिडिओ कॉलमुळे झाला. “वॉशिंग्टन डीसीमधील वरिष्ठ दूतावास अधिकारी” असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीचा हा कट एका चुकलेल्या कॉलमुळे उघडकीस आला.
महिला डॉक्टर आणि आरोपी शैलेश पारेख यांचा परिचय २०१० साली एका विवाहसंकेतस्थळावर झाला होता. दोघांमध्ये साध्या शुभेच्छा देण्यापुरता संपर्क होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी आपल्या पुतण्याच्या अमेरिकेतील दीक्षांत समारंभासाठी व्हिसा मिळवण्यास मदत मागितली असता, आरोपीने वेगवेगळ्या सबबी सांगून तिच्याकडून हळूहळू २ लाखांहून अधिक रुपये उकळले.
१५ फेब्रुवारी रोजी, डॉक्टरच्या फोनवर अचानक आरोपीचा व्हिडिओ कॉल आला. तो स्वीकारताच डॉक्टरला धक्का बसला-स्वतःला अमेरिकेतील अधिकारी म्हणवणारा शैलेश प्रत्यक्षात मुंबईतील एका गर्दीच्या परिसरात रिक्षामध्ये बसला होता. त्यामुळे डॉक्टरला त्याच्या खोटेपणाची खात्री पटली. तिने तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणात शैलेशच्या पत्नी बीनाचा देखील सहभाग असल्याचा संशय आहे. बीनाने डॉक्टरला फोन करून स्वतःला “वॉशिंग्टन डीसीतील दूतावासातील सहकारी” म्हणून सादर केले आणि पैसे ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त केले. डॉक्टरने तिच्या सांगण्यावरून १.५ लाख रुपये पाठवले होते, तर उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने पाठवली गेली.
जुहू पोलिसांनी शैलेश आणि बीना यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, दोघांचा शोध सुरू आहे. सायबर गुन्हे शाखेच्या अहवालानुसार, महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामध्ये आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेल, बनावट प्रोफाइल आणि मॉर्फ केलेल्या प्रतिमांचा समावेश आहे.
विवाह संकेतस्थळांवरील बनावट प्रोफाइलमुळे महिलांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. २०२१ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान, मुंबईत परदेशी नागरिक असल्याचे भासवून अशा फसवणुकीत ७३ नागरिकांना गंडवले गेले. मुंबई पोलिसांनी अशा १९ प्रकरणांचा उलगडा करून २३ जणांना अटक केली आहे. या घटनेवरून विवाह संकेतस्थळांवर आणि सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सावधानता बाळगण्याची गरज आहे, असे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

व्हिडिओ कॉलमुळे फसवणुकीचा पर्दाफाश : अमेरिकन व्हिसाच्या बहाण्याने २ लाख रुपयांची फसवणूक
•
Please follow and like us:
Leave a Reply