संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची कशा पद्धतीने निर्घृण हत्या केली, याचे थरकाप उडवणारे पुरावे न्यायालयासमोर सादर केले.
सरकारी वकिलांनी न्यायाधीशांसमोर संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या अमानुष मारहाणीचे व्हिडीओ दाखवले. या व्हिडीओंमध्ये मारहाणीनंतर आरोपींनी संतोष देशमुख यांच्या तोंडात लघवी केल्याचे भयंकर दृश्यही दिसून आले. सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि भाऊ धनंजय देशमुख यांना हे दृश्य पाहून अश्रू अनावर झाले.
मुख्य सरकारी वकिलांनी या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा ठाम युक्तिवाद केला. मात्र, बचाव पक्षाकडून वाल्मिक कराड याच्यावतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला असून, मोक्का कायदा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर शहा निर्णयानुसार अटकेची कारणे लेखी देण्यात आलेली नसल्याचा युक्तिवादही करण्यात आला. घटनेच्या दिवशी कराड हा शेकडो किलोमीटर दूर असल्याचा दावाही बचाव पक्षाने मांडला.
यावर सरकारी वकील ॲड. अमरजितसिंह गिरासे यांनी प्रत्येक तारखेचा घटनाक्रम तपशीलवार उलगडून सांगितला. साक्षीदारांचे जबाब, मोबाईल कॉल डिटेल्स (सीडीआर), सीसीटीव्ही फुटेज, ध्वनिफिती आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले. या पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट होते, असा युक्तिवाद त्यांनी केला.
सरकारी पक्षानुसार, वाल्मिक कराड याने आवादा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या मागणीच्या आड येत असल्याने संतोष देशमुख यांना संपवण्याचे आदेश त्याने दिले. त्यानंतर उमरी टोलनाक्यावरून संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्जन ठिकाणी नेऊन त्यांची नृशंस हत्या करण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ डिसेंबर रोजी होणार आहे.


Leave a Reply