फक्त १५ मिनिटांत विरार ते पालघर! ‘रो-रो’ सेवेचा जलद प्रवास सुरू

विरार ते खारवाडेश्री (सफाळे) या मार्गावर बहुप्रतिक्षित रो-रो फेरीबोट सेवेचा शुभारंभ आज, शनिवारी प्रायोगिक तत्त्वावर होणार आहे. ही सेवा महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत आणि मेसर्स सुवर्णदुर्ग शिपिंग अ‍ॅण्ड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. या खाजगी संस्थेमार्फत सुरू केली जात आहे.या सेवेमुळे सध्या रस्ते मार्गाने लागणारा एक ते दीड तासांचा प्रवास केवळ १५ मिनिटांत समुद्रमार्गे पूर्ण होणार आहे. परिणामी, प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे, तसेच वाहतूक कोंडीपासूनही सुटका मिळणार आहे.

वसई-विरारनंतर आता दुसरा टप्पा;विरार–सफाळे सेवा कार्यान्वित

वसई, विरार आणि मिरा रोड–भाईंदर दरम्यान रो-रो सेवा मागील वर्षी सुरू झाली होती. आता दुसऱ्या टप्प्यात विरार ते सफाळे (खारवाडेश्री) ही सेवा सुरू होत आहे. ही सेवा पालघर, सफाळे आणि त्याहून पुढे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आवश्यक पर्याय ठरणार आहे. सध्या वसई-विरारकरांना सफाळे किंवा पालघर गाठण्यासाठी रस्तेमार्गाने दीड तासाचा वेळ लागत होता. वाहतूक कोंडी, रेल्वे सेवेची कमतरता यामुळे नागरिक त्रस्त होते. यामुळेच वसईप्रमाणे विरार–पालघर दरम्यानही रो-रो सेवा सुरू करण्याची जोरदार मागणी होती.

हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश

या मागणीसाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अखेर ही सेवा प्रत्यक्षात उतरली असून, यामुळे स्थानिक जनतेसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.ही नवी सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत असली तरी भविष्यात या मार्गावरचा प्रवास अधिक सुकर, जलद आणि पर्यावरणपूरक होईल, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

विरार ते सफाळे रो-रो सेवेसाठी विरारमधील नारंगी जेट्टी तयार झाली आहे. तर, सफाळेमधील खारवाडेश्री रो-रो जेट्टी उभारण्यात आली आहे. फेरीबोट सेवेचे तिकीट दर प्रायोगिक तत्त्वावर काही महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहे. प्रदूषणमुक्त, पर्यावरणस्नेही आणि आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने जनतेसाठी ही सेवा वेळेची बचत करणारी आणि दिलासादायक ठरेल असा विश्वास सागरी मंडळाचा आहे.

प्रवास होणार सुलभ

विरार ते पालघर हा जलमार्ग नागरिकांसाठी, तसेच रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सोयीचा ठरणार आहे. या जलमागांमुळे वसई-विरार ते सफाळा-केळवा परिसरात प्रवास करणे सुलभ होणार असून, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, विरार येथून रस्तामार्गे ७० किमीवर असणारे हे अंतर या जलमार्ग सोयीमुळे निम्म्यावर येईल. जलमार्गे हे अंतर केवळ तीन किमीवर येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.

१०० प्रवासी, ३३ वाहने वाहून नेण्याची क्षमता?
महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वैतरणा खाडीमध्ये विरार ते खारवाडे दरम्यान सध्या प्रायोगिक तत्त्वावर रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा सुरू होणार आहे. सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरिन सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीला ही रो-रो फेरीबोट सेवा चालवण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून परवानगी देण्यात आली आहे. एका फेरीत १०० प्रवासी आणि ३३ वाहने नेण्याची क्षमता फेरी बोटीची असेल, असा अंदाज आहे

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *