नवी दिल्ली : देशभरातील मतदार याद्या अचूक व त्रुटीमुक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच सुरू होणाऱ्या विशेष पुनरावलोकन मोहिमेत (एसएसआर) जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा थेट निवडणूक यंत्रणेशी जोडला जाणार असून त्यामुळे मृत व्यक्तींची नावे मतदार याद्यांतून आपोआप हटवली जातील.
निवडणूक आयोगाचे मत आहे की, अनेक वर्षांपासून लाखो मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत राहिलेली होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेत गोंधळ निर्माण होत होता. बिहारमध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या विशेष पुनरावलोकन मोहिमेत यशस्वी प्रयोग करण्यात आला. त्यावेळी एकूण ४५ हजार नावे हटवण्यात आली, त्यापैकी २२ हजार नावे मृत व्यक्तींशी संबंधित होती. या अनुभवाच्या आधारे आता देशभर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची माहिती तात्काळ उपलब्ध झाल्यास निवडणूक यंत्रणेच्या मदतीने त्या व्यक्तीचे नाव लगेच वगळता येईल. त्यामुळे मतदार याद्या अचूक आणि स्वच्छ होतील.
या प्रक्रियेसाठी मृत्यू नोंदणीचा डेटा रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया तसेच UIDAI कडून थेट निवडणूक आयोगाला मिळणार आहे. यामुळे स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांना मृत व्यक्तींची माहिती वेळेवर मिळेल आणि त्यांची नावे तात्काळ यादीतून वगळली जातील. तसेच आधार, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या डेटा लिंकिंग उपक्रमामुळे या कामाला अधिक गती मिळणार आहे. निवडणूक आयोगाचा विश्वास आहे की या उपक्रमामुळे मतदार याद्यांतील मृत व्यक्तींची नावे वेळेत वगळली जाऊन यादी अधिक अचूक व त्रुटीविरहित बनेल.
Leave a Reply