भारतीय हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्यात उष्णतेने नागरिक हैराण आहेत. अशातच आता विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवस मिश्र स्वरुपाचे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवार ४ मे ला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अमरावती यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा गोंदिया गडचिरोली येथे अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
सोमवारी ५ मे रोजी संपूर्ण राज्यात पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ येथे बहुतांश ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारी ६ मे ला राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासह, कोकण पट्टा, मराठवाडा आणि विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपुरात पावसाचा यलो अलर्ट असणार आहे.
सध्या चक्राकार वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रालगतच्या राजस्थान आणि मध्यप्रदेशात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सागर किनारपट्टीलगतचा भाग वगळता उर्वरित राज्यात उद्या ४ मे ला वीजांच्या गडगडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. तर ५ आणि ६ मे ला संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. दरम्यान विदर्भात सध्या तापमानाचा उच्चांक पाहायला मिळत आहे. सर्वच भागातील तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे.
विदर्भातील नागपूरसह वर्धा आणि भंडारामध्ये पुढील काही तास ढगाळ वातावरण राहणार असून वादळी वाऱ्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर पुढील २ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. यामध्ये वीजांच्या गडगडाटाचीही शक्यता आहे. ४० ते ५० किमी ताशी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Leave a Reply