महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याची तंबी देण्यात आली आहे. अधिकारी किंवा कर्मचारी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडत असल्यास त्यांच्यावर निलंबन किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. महसूल विभागाकडून परिपत्रक काढून हा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर तातडीने हे परिपत्रक काढण्यात आले आहे.
जे अधिकारी वारंवार विनापरवानगी गैरहजर राहत असतील त्यांना एक संधी देऊन नंतर थेट कारवाई, हा पर्याय अवलंबला जाईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.हा विभाग जनसेवेसाठी असून यात कसूर केल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा महसूल विभागाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रात म्हटलं आहे. परिपत्रात पुढे म्हटलंय की अधिकारी परवानगी शिवाय मुख्यालय सोडत असेल तर त्यांना प्रथम सक्त इशारा द्या, सुधारणा न झाल्यास तात्काळ शिस्तभंगाचा प्रस्ताव तयार करून गरज पडल्यास निलंबनाची कारवाई करा, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
तसंच पुढे पत्रात म्हटलंय की, शासकीय सुट्ट्या किंवा शासकीय दौऱ्यावर अधिकारी कर्मचारी असतील तर गैरहजरी मान्य करण्यात येईल. मात्र इतरवेळी मुख्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे. कोणताही अधिकारी परवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाही, तसं आढळून आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबीच परिपत्राद्वारे देण्यात आली आहे. आता या पत्राद्वारे बेशिस्त अधिकारी कर्मचारी वळणावर येतात की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती होते, हे पहावं लागेल.
Leave a Reply