मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये डिझेलऐवजी पाणी!19 गाड्या बंद पडल्या

रतलाम, मध्य प्रदेश: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हा गाड्यांमध्ये डिझेलऐवजी पाणीमिश्रित इंधन भरल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गाड्या डिझेल भरल्यानंतर काही अंतरावरच एकामागोमाग एक बंद पडल्या. या घटनेमुळे तात्काळ कारवाई करत संबंधित पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. गुरुवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या वाहनांचा ताफा इंदूरहून रतलामकडे जात होता. त्यावेळी डोसीगाव परिसरातील भारत पेट्रोलियमच्या ‘शक्ती फ्युएल्स’ या पेट्रोल पंपावरून ताफ्यातील गाड्यांमध्ये डिझेल भरण्यात आले. डिझेल भरल्यानंतर काही अंतर पुढे जाताच गाड्या बंद पडू लागल्या. प्राथमिक तपासणीत डिझेलमध्ये पाणी मिसळल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार आशिष उपाध्याय, अन्न व पुरवठा अधिकारी आनंद गोरे आणि इतर अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पेट्रोल पंपाची तपासणी केली आणि तात्काळ तो सील केला.

गाड्यांना ढकलण्याची वेळ आली!

डिझेलमध्ये पाणी मिसळल्यामुळे सर्व १९ इनोव्हा गाड्या बंद पडल्या आणि त्यांना ढकलण्याची वेळ आली. या अनपेक्षित प्रकारामुळे सर्वजण चक्रावले. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी इंदूरहून दुसऱ्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली, त्यानंतरच ताफा रतलामसाठी रवाना झाला. या प्रकारावर भारत पेट्रोलियमचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीधर यांना बोलावण्यात आले. त्यांनीही तपासणी केली आणि सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पेट्रोल पंपातील डिझेलच्या टाकीत पाणी झिरपले असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याच पंपावरून एका ट्रकमध्येही 200 लिटर डिझेल भरले होते, जो काही अंतरावर जाऊन बंद पडला. या प्रकरणी अहवाल सादर केल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल, असे नायब तहसीलदार आशिष उपाध्याय यांनी सांगितले.
रतलाममध्ये मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे उद्योग, कौशल्य आणि रोजगार या विषयावरील एका कार्यक्रमाला उपस्थित होते, पण त्यांच्या ताफ्यातील गाड्यांबाबत घडलेल्या या प्रकाराचीच चर्चा संपूर्ण मध्य प्रदेशात होती.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *