मुंबई : मागील काही वर्षांपासून राज्यातील बहुतांश महानगरपालिका निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका कधी होतील, असा सवाल मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अशात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका इव्हेंटमध्ये दिलेल्या मुलाखतीत महापालिका निवडणुका लवकरच होतील आणि त्या लवकर व्हाव्या, असं आम्हाला वाटतं असं स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केलं. सध्या महापालिका निवडणुकीचा चेंडू सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्याच्या सुनावणीची तारीख पे तारीख सुरू आहे. आता मुख्यमंत्र्यांनी त्यावर थेट भाष्य केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
महापालिकांच्या निवडणुका कधी होतील, हे एआय सुद्धा सांगू शकत नाही. आपल्या संविधानात सर्वोच्च न्यायालय हे एआयपेक्षा वरच्या स्थानावर आहे. सर्वोच्च न्यायालय ठरवेल तेव्हा महापालिका निवडणुका होतील. त्या लवकर व्हाव्यात, असे आम्हालाही वाटते. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्याना आम्ही त्यापासून वंचित ठेऊ शकत नाहीं. येत्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालय याबाबत लवकरच निर्णय घेईल, असं मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले, महानगरपालिका निवडणुकांसाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे. न्यायालयाचा निर्णय येताच आम्ही निवडणूक प्रक्रियेस गती देऊ. ते शुक्रवारी मुंबईतील जिओ सेंटरमध्ये ‘मुंबई टेक विक 2025’ या आशियातील सर्वात मोठ्या एआय इव्हेंटच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.
‘या’ महापालिका निवडणुकीच्या प्रतीक्षेत
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर , भिवंडी-निजामपूर, वसई- विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी. वरील महापालिकांसह राज्यातील अनेक भागात जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
निवडणुका का रखडल्या?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत पुढील सुनावणी 4 मार्च रोजी होणार आहे. आता या पुढच्या सुनावणीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. निर्णय झाला तरी उन्हाळ्यात निवडणुका होतील का, याबाबत अधिक साशंकता आहे.
Leave a Reply