कोण आहेत सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग? जगभरात होतीय त्यांची चर्चा

दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना जशाच तसं उत्तर द्या, अशी भारतीयांची मागणी होती. मंगळवारी रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. साधारण २५ मिनिटांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली असल्याची माहिती लष्कराच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे, भारतीय लष्कराने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांनी या ऑपरेशनबाबत माहिती दिली आहे. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला अधिकाऱ्यांनी लष्कराने केलेल्या या कारवाईबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे. ही कारवाई कुठे, कशी पार पाडली गेली याची सविस्तर माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सध्या देशभरात या दोघींच्या नावाची चर्चा सुरू आहे.

कोण आहेत सोफिया कुरेशी?

कर्नल सोफिया कुरेशी या धैर्य आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पुणे येथे झालेल्या बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास ‘एक्सरसाइज फोर्स 18’ मध्ये त्यांनी भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते. असे करणार्‍या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. पुण्यात 2 मार्च ते 8 मार्च दरम्यान झालेल्या या युद्ध सरावात 18 देशांनी भाग घेतला होता. यात ASEAN सदस्य देशांसोबत जपान, चीन, रशिया, अमेरिका, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश होता. सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातही सैन्याची मोठी परंपरा आहे. त्यांचे आजोबा लष्करात होते. तर, सोफिया यांचे पती मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत. पाकिस्तानवर बोलताना त्या म्हणाल्या की, पाकिस्तानात तीन दशकांपासून दहशतवादी तळं उभी केली जात आहेत. हे तळ पाकिस्तान आणि POK मध्ये पसरलेले आहेत. पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ लॉन्च केले. यात नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते उद्ध्वस्त करण्यात आले.

व्योमिका सिंह कोण आहेत?

विंग कमांडर व्योमिका सिंह यांचं लहानपणापासूनच भारतीय वायुसेनेत भरती होण्याचं स्वप्न होतं. त्या भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्यांना धोकादायक ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत अडीच हजार तासांपेक्षा जास्त हेलिकॉप्टर उडवले आहे. व्योमिका यांनी ईशान्य भारतातील राज्ये आणि जम्मू-काश्मीरसारख्या कठीण प्रदेशात चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर उडवले आहेत. त्यांनी अनेक बचाव कार्यांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेशात एका कठीण बचाव कार्याचे नेतृत्व केले होते आणि लोकांचे प्राण वाचवले होते. पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यावेळी नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ते यशस्वीपणे नष्ट केले. हे तळ निवडताना या गोष्टीची काळजी घेतली गेली की, तेथील नागरिकांना किंवा तेथील इतर इमारतींना कोणतीही इजा पोहोचू नये.”

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *