मुंबई शहराचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर हे ३० एप्रिल रोजी अधिकृतपणे निवृत्त होणार असून, त्यांच्या निवृत्तीनंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे कोणाकडे जाणार, यावर चर्चेला उधाण आले आहे.1989 च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या फणसळकर यांच्यानंतर या महत्त्वाच्या पदासाठी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत.त्यामध्ये सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार यांच्यासह महिला अधिकारी अर्चना त्यागी यांची नावे आघाडीवर आहेत.तसेच, सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले देवेन भारती हे देखील या शर्यतीत एक महत्त्वाचे नाव मानले जात आहे.
विवेक फणसळकर यांनी ३० जून २०२२ रोजी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. मात्र त्यांचा कार्यकाळ वाढवला जाण्याची शक्यता कमी असल्यामुळे ३० एप्रिल २०२५ रोजी ते निवृत्त होत आहेत.त्यांच्या निवृत्तीनंतर पुढील आयुक्त कोण होणार, यावर चर्चा रंगली आहे. या पदासाठी १९९०च्या बॅचचे दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते आणि संजयकुमार वर्मा आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणेत (एनआयए) सध्या महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सुरू असल्यामुळे दाते यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता कमी आहे.
संजयकुमार वर्मा यांची नाव चर्चेत असली तरी, गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार त्यांची पोलीस महासंचालकपदी झालेली नियुक्ती आणि त्यावेळी निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, त्यांच्या आयुक्तपदावर नेमणुकीची शक्यता फार कमी दिसत आहे.याचदरम्यान, १९९२च्या बॅचचे अधिकारी रितेश कुमार, अमिताभ गुप्ता आणि संजीवकुमार सिंघल हे देखील या शर्यतीत आहेत. मात्र, या तिघांमध्ये रितेश कुमार हे अधिक प्रबळ दावेदार मानले जात आहेत, आणि तेच अंतिम क्षणी आयुक्तपदावर विराजमान होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई पोलिस आयुक्तपदासाठी शर्यत रंगत असताना, सरकार महिला अधिकाऱ्याला संधी देण्याच्या विचारात असल्यास १९९३बॅचच्या अर्चना त्यागी हा एकमेव पर्याय आहे.त्याचप्रमाणे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. फणसळकर यांच्या निवृत्तीपर्यंत मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय झाला नाही, तर अतिरिक्त कार्यभार देवेन भारती यांना सुपूर्द केला जाऊ शकतो.


Leave a Reply