रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरेपुंजे यांच्या पत्नी सौ. स्नेहा गिरेपुंजे यांची राज्य पोलिस सेवेत उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यंदा ९ जून रोजी आकाश राव गिरेपुंजे (वय ४२) हे तपासणीसाठी खाणी परिसरात गेले असताना माओवाद्यांनी घातलेल्या आयईडी स्फोटात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर मोठा आघात झाला. त्यामुळे मंत्रिमंडळाने विशेष प्रकरण म्हणून त्यांच्या पत्नीला दयामूलक नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला. शासनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “स्नेहा गिरेपुंजे यांना राज्य पोलिस सेवेत उपअधीक्षक पदावर नियुक्त केले जाईल.”
या निर्णयाबद्दल गिरेपुंजे यांचे बंधू आकाश गिरेपुंजे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ही बातमी ऐकून आम्हाला आनंद झाला. आमच्या भावाची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण वहिनी नक्कीच उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवतील, असा आम्हाला विश्वास आहे.” दरम्यान, या बैठकीत आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या सौरऊर्जा धोरणात सुधारणा करून ते २०३० पर्यंत लागू राहील, असे निश्चित करण्यात आले. या धोरणांतर्गत सौरऊर्जा प्रकल्पांना गुंतवणूक प्रोत्साहन, करसवलती, वीज शुल्कातून सूट तसेच उद्योग क्षेत्रासारखे विशेष दर्जा दिला जाईल. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सौरऊर्जा प्रकल्पांमुळे राज्यात गुंतवणूक वाढेल आणि उद्योगधंद्यांना चालना मिळेल. विशेषत: २०१७-२७ धोरणाअंतर्गत उभारलेले प्रकल्प औद्योगिक प्रोत्साहनांच्या पात्रतेसाठी मान्य राहतील. औद्योगिक विकास धोरण २०२४-३० अंतर्गत या प्रकल्पांना महत्त्वपूर्ण लाभ मिळणार आहेत.
Leave a Reply