मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) नोकऱ्या जाण्याची शक्यता व्यक्त होत असताना जगभरातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ‘ग्लोबल पब्लिक ओपिनियन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या सर्वेक्षणात सहभागी २१ देशांपैकी भारत, पाकिस्तान आणि इंडोनेशियातील नागरिकांना नोकरी जाण्याची सर्वाधिक भीती असल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतातील तब्बल ८५ टक्के लोकांना वाटते की एआयमुळे त्यांची नोकरीवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये ४५ टक्के लोकांनी “नक्कीच होईल” असे ठाम मत व्यक्त केले, तर ४० टक्क्यांनी “कदाचित होईल” असे सांगितले. पाकिस्तानमध्ये ३४ टक्के लोकांना खात्री आहे की त्यांची नोकरी जाणार असून ५१ टक्के लोकांना शक्यता वाटते. इंडोनेशियामध्येही अशीच स्थिती आहे. अर्जेन्टिनामध्ये ८२ टक्के लोकांना नोकरी धोक्यात असल्याचे वाटते.
याउलट अमेरिका, जर्मनी, जपान, ब्रिटनसारख्या विकसित देशांमध्ये ही भीती खूपच कमी आहे. अमेरिकेत फक्त १५ टक्के लोकांनी ठामपणे नोकरी जाणार असल्याचे मान्य केले. जर्मनीत हा आकडा १२ टक्के, तर जपानमध्ये अवघा ९ टक्के आहे. तज्ज्ञांच्या मते, विकसित देशांमध्ये कामकाजाची पद्धत, तंत्रज्ञानाचा प्रगत वापर आणि सामाजिक सुरक्षिततेमुळे ही भीती कमी आहे. सर्वेक्षणानुसार विकसनशील देशांतील लोकांना एआयमुळे नोकरी जाण्याची तीव्र चिंता आहे, कारण तिथे रोजगाराच्या संधी कमी असून कामगारांची संख्या जास्त आहे. उलट विकसित देशांमध्ये कामगारांसाठी पर्यायी रोजगार व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या योजना उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर भीती नाही. एआयमुळे मानवी श्रमाची जागा मशीन घेत आहे. त्यामुळे भविष्यात कामाच्या संधी, रोजगाराचे स्वरूप आणि कौशल्याची मागणी यात मोठे बदल होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे रोजगार टिकवण्यासाठी नवे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही सूचित करण्यात आले आहे.
Leave a Reply