अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात शुल्क (टॅरिफ) धोरण अखेर अमलात येण्याची शक्यता आहे. २ एप्रिलपासून भारतावर हे टॅरिफ लागू होऊ शकते, ज्याचा मोठा आर्थिक प्रभाव दिसून येईल. ऑटोमोबाईलपासून फार्मास्युटिकल्स आणि दागिने उद्योगांपर्यंत अनेक क्षेत्रांना फटका बसणार आहे. शेअर बाजारातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अनेकदा “टॅरिफ किंग” असा टोला लगावला आहे. त्यांनी अलीकडेच परस्पर शुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) लागू करण्याची घोषणा केली होती, जी २ एप्रिलपासून अंमलात येऊ शकते. याचा परिणाम ३१ अब्ज डॉलर्सच्या भारतीय निर्यातीवर होऊ शकतो.
कोणत्या क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम?
• ऑटोमोबाईल्स – कार आणि ऑटो पार्ट्स उद्योगावर मोठा प्रभाव
• फार्मास्यूटिकल्स – भारतीय औषध कंपन्यांना मोठा आर्थिक फटका
• इलेक्ट्रॉनिक्स – लॅपटॉप, मोबाइल यांसारख्या उत्पादनांवरील कर वाढण्याची शक्यता
• ज्वेलरी उद्योग – भारतीय दागिने ब्रँड्सच्या निर्यातीवर नकारात्मक परिणाम
अमेरिका सध्या भारतीय औषधांच्या आयातीवर तुलनेने कमी शुल्क आकारते. मात्र, जर अमेरिकेने भारतीय औषधांवर उच्च टॅरिफ लादले, तर भारतातील फार्मा कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. सन फार्मा, सिप्ला, ल्युपिन आणि डॉ. रेड्डीज लैब यांसारख्या कंपन्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतीय ज्वेलरी ब्रँड्स, जसे की मलाबार गोल्ड,राजेश एक्सपोर्ट्स आणि कल्याण ज्वेलर्स, यांनी अमेरिकन बाजारपेठेत चांगली प्रगती केली आहे. मात्र, ट्रम्प टॅरिफमुळे त्यांच्या निर्यातीवर परिणाम होईल आणि शेअर्स घसरू शकतात. त्याचप्रमाणे, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील डिक्सन टेक्नोलॉजीज आणि केनेस टेक्नोलॉजी यांसारख्या कंपन्यांनाही टॅरिफचा मोठा फटका बसू शकतो.
शेअर बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज आहे की जर अमेरिकेत व्यापार तणाव वाढला आणि ग्राहक खर्च कमी झाला, तर इन्फोसिस आणि टीसीएससारख्या आयटी कंपन्यांनाही आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
भारत सरकार ट्रम्प टॅरिफ रोखू शकते का?
भारत सरकारने ट्रम्प टॅरिफ टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. अलीकडेच अॅमेझॉन आणि गुगल सारख्या अमेरिकन कंपन्यांवरील करात सवलत देण्यात आली. याशिवाय, काही अयात शुल्क कमी करण्याचाही विचार केला जात आहे. त्यामुळे ट्रम्प टॅरिफ लागू होतो की थांबवला जाईल, हे २ एप्रिल रोजी स्पष्ट होईल.
Leave a Reply