दौंड तालुक्यातील कडेठाण गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव करून एका महिलेचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवत पोलिसांच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि फौजदार सलीम शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर या गुन्ह्याचे सत्य समोर आले. आरोपीने खुनाची कबुली दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
७ डिसेंबर २०२४ रोजी लता धावडे या महिलेचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळला. सुरुवातीला हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि तिच्या पुतण्याने अनिल धावडेने पोलिसांत तक्रार नोंदवली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला, पण मृतदेहावरील जखमांमध्ये विसंगती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे शवविच्छेदनासाठी व्हीसेरा नमुना नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला.
३ मार्च २०२५ रोजी फौजदार सलीम शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तपासादरम्यान सतीलाल मोरे हा संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. शेवटी त्याने लता धावडे यांच्या खुनाची कबुली दिली.
पोलिस तपासात अनिल धावडे आणि त्याची चुलती लता धावडे यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. काही दिवसांपासून लता धावडे यांनी भेटणे बंद केले होते आणि पैशांची मागणी करत होत्या. त्यामुळे अनिल धावडेने आपल्या मजूर सतीलाल मोरेला दीड लाख रुपयांचे आमिष दाखवून खुनाचा कट रचला.
अनिल धावडे आणि सतीलाल मोरे यांनी मिळून लता धावडे यांना दगडाने ठेचून ठार मारले. गावकऱ्यांना आणि पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी मृतदेहावर ओरखडे करून बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव तयार केला.
नागपूर प्रयोगशाळेच्या अहवालात हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झालेला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अनिल धावडे आणि सतीलाल मोरे यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply