मध्य प्रदेशातील मुरैना आणि भिंड जिल्ह्यांत प्राण्यांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. मुरैनामध्ये एका महिलेने आणि तिच्या मुलाने तीन भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांना काठ्यांनी मारून ठार केल्याची घटना समोर आली असून, भिंडमध्ये एका कुत्र्याचे दात पक्कडाने उपटल्याचा अघोरी प्रकार उघड झाला आहे. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत.
मुरैना जिल्ह्यातील महावीरपुरा भागात घडलेल्या या घटनेत सलमा नावाच्या महिलेसह तिचा मुलगा अरमान खान यांनी तीन भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांना अमानुषपणे काठ्यांनी मारले. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक गो-रक्षा समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी दीपेंद्र सिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करून आरोपींची ओळख पटवली. दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “शेजाऱ्यांच्या सांगण्यानुसार, या कुटुंबाला भटक्या कुत्र्यांमुळे त्रास होत होता.” मृत पिल्ल्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, परिसरात आणखी एक पिल्लू आणि एक मोठा कुत्रा मृत अवस्थेत आढळल्याने त्याचा या घटनेशी संबंधित असण्याचा तपास सुरु आहे.
भिंड जिल्ह्यातील देवरी कलान येथील रावतपुरा खुर्द गावात सोमवारी एका भटक्या कुत्र्यावर क्रूर वर्तनाचा प्रकार घडला. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, कुत्र्याला लाकडी खाटेखाली बांधून ठेवले गेले असून, काही जण त्याच्या अंगावर उभे राहून त्याला दाबून ठेवत आहेत. त्याचवेळी एक व्यक्ती त्याच्या तोंडात काठी घालतो आणि दुसरा पक्कडाने त्याचे दात उपटतो. या प्रकरणी दाबोह पोलिस ठाण्याचे प्रभारी राजेश शर्मा यांनी सांगितले की, “BNS कलम ३२५ आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार सहा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओच्या आधारे अजून आरोपी शोधले जात आहेत.”
“स्थानिक स्वयंसेवी संस्थेने आम्हाला या घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांनी सांगितले की कुत्र्याने काही लोकांना चावले होते, मात्र ज्यांना चावा बसला ते या घटनेत सहभागी नव्हते,” असे शर्मा यांनी स्पष्ट केले. तपासात आतापर्यंत तिघांची ओळख पटली असून उर्वरित तिघे अद्याप अज्ञात आहेत. “व्हिडिओमध्ये आणखी लोक दिसत असून, पुढील तपासात त्यांची नावेही उघड होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गावातील काही ज्येष्ठांनी हा प्रकार बघूनही दुर्लक्ष केले, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असेही शर्मा म्हणाले. त्यांनी सांगितले की, “तो कुत्रा अजूनही घाबरलेल्या अवस्थेत गावातच फिरत आहे. त्याला योग्य उपचार मिळावेत यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत.”


Leave a Reply