लातूर : शहरातील रेनापूर नाका परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलने ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या तीन तरुणींना रस्त्यात थांबवून मारहाण केली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर घडली. तीन तरुणी एका स्कुटीवर ट्रिपल सीट बसून भरधाव वेगाने जात असताना, महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलने त्यांना थांबवले. नियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी, कॉन्स्टेबलने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कॉन्स्टेबल तरुणींना अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ करताना दिसत आहे. “एकतर तिघी बसून चालल्यात, त्यात मागच्या दोघी वाकड्या बसल्या, रेस गाडी चालण्याचे लायसन्स मिळालं का? पायतन काढून हानीन तिघींना पण… मी लय घाण बोलेन, पटकन बापाला फोन लावा…” अशा शब्दांत ती तरुणींवर ओरडत आहे. कॉन्स्टेबलने वापरलेले अनेक शब्द इतके आक्षेपार्ह होते की त्यांचा उल्लेखही करता येत नाही.
या घटनेचा व्हिडीओ जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये तरुणी कॉन्स्टेबलची माफी मागताना दिसत आहेत, पण कॉन्स्टेबलचा राग काही शांत झाला नाही.
या प्रकरणामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलला सार्वजनिक ठिकाणी मुलींना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्याचा आणि मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. आता या प्रकरणी संबंधित महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply