पणजी (प्रतिनिधी) :मराठी साहित्यविश्वासाठी ऐतिहासिक ठरणारे जागतिक मराठी संमेलन यंदा गोव्याची राजधानी पणजी येथे होणार आहे. जागतिक मराठी अकादमी, गोवा मराठी अकादमी, गोमन्तक साहित्य सेवक मंडळ इन्स्टिट्यूट मिनिझेस ब्रागांझा (आयएमबी) व बिल्वदल परिवार या संस्थांच्या संयुक्त विद्यमान ९ ते ११ जानेवारी २०२६ मध्ये हे संमेलन पार पडणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात शास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. अनिल काकोडकर यांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयाची घोषणा प्रख्यात कवी रामदास फूटाणे यांनी पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेत दशरथ परब, प्रा. अनिल सामंत, प्रा. डॉ. अशोक पाटील, रमेश वंसकर, सागर जावडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संमेलनाची रूपरेषा, कार्यक्रमांचे स्वरूप व अपेक्षित सहभाग याबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
प्रा. अनिल सामंत यांनी या संमेलनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मराठी भाषेला मोलाचे स्थान आहे. गोव्यातील सांस्कृतिक परंपरा आणि मराठी साहित्य यांचा संगम अधिक दृढ व्हावा, यासाठी हे संमेलन महत्त्वाचे ठरणार आहे. विविध उपक्रम, चर्चासत्रे व साहित्यिक मैफलींमुळे मराठीचा विकास अधिक व्यापक प्रमाणावर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संमेलनादरम्यान साहित्यिक परिसंवाद, काव्यवाचन, चर्चासत्रे, नाट्यप्रयोग तसेच मराठी साहित्याशी संबंधित विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. गोव्यातील विविध साहित्यिक संस्था, लेखक, कवी, कलाकार आणि वाचक मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
Leave a Reply