नर्मदे हर … हर हर नर्मदे
नदीचे रूप विलोभनीय असते. तिची माया लोहचुंबकाप्रमाणे खेचून घेणारी असते. अन्यत्र हा अनुभव मिळेल का हे मी सांगू शकत नाही पण तुम्हाला याचा प्रत्यय नर्मदाकिनारी येवू शकतो. तसं पाहिलं तर नर्मदा ही गंगेपेक्षाही जुनी, प्राचीन. तिचं पाणी, ज्याला नर्मदा परिक्रमा करणारे ‘दूध’ म्हणतात, ते प्राशन करून कित्येक पिढ्या जगल्या, वाढल्या. पण मागून आलेल्या गंगेने मात्र आपल्या लांबी-रुंदी विस्ताराच्या जोरावर नर्मदेला मागे टाकले.नर्मदेची लांबी केवळ १३१२ कि.मी. तर नगाधिराज हिमालयातून उमग पावणारी आणि नर्मदेच्या जवळपास दुप्पट २५२५ कि. मी.लांब प्रवास करणारी गंगा म्हणजे भारतातील ९ राज्यातील २५ टक्के भारतीयांचा जीवनाधार.
गंगा म्हणजे , तसं पाहिलं तर शंकर प्रिया. साक्षात शंकराच्या ‘डोक्यावर’ बसलेली त्याची सखी. पण रागीट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पार्वतीला तिचे हे प्रस्थ पार्वतीला पटले नाही किंवा झेपले नाही, म्हणून खरे तर तिची पाठवण, माफ करा , हकालपट्टी पृथ्वीवर झालेली. पण पदार्पणातच तिने शंकरकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नर्मदेला मागे टाकले, अगदी सर्व बाबतीत. नर्मदेचा जन्म शंकराच्या घामातून झाला अशी दंतकथा आहे. मध्य प्रदेशातील अमरकंटकच्या जंगलात तिचा उगम. शिवशंकर तांडव करता-करता घामाघूम झाले, त्यांच्या घामाची धारा प्रवाहित झाली आणि नर्मदेचा जन्म झाला, अशी मध्य प्रांत – गुजरातेतील लोकांची श्रद्धा. नर्मदा ही अखंड कुमारिका आहे. तिच्या जवळूनच उगम पावणाऱ्या ‘शोण’ नदाने तिच्या प्रीतीच्या नादाने तिचा हात मागितला होता. पण नर्मदेने मोठ्या फणकाऱ्यात त्याला नाकारले. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला शोण उंच मैकल पर्वताच्या कड्यावरून अगदी नर्मदेच्या विरुद्ध देशेला वाहता झाला.अशी गंमतीशीर लोककथा.
तर अशी ही अल्लड कुमारी नर्मदा आहे भलती गोड. अमरकंटकला आपल्या घरातील नळाला येणाऱ्या धारे इतकी दिसणारी नर्मदा जबलपूरच्या भेडा घाटात पहाड फोडत प्रलयंकारी रूप घेताना दिसते. जिथे तिच्या पात्रात वाळू दिसते, तिथे तिला ‘रेवा’ म्हणतात. जिथे तिचा प्रवाह फेसाळत जातो, तिथे तिला दुग्धधारा म्हणतात. ती शिवकन्या आहे, त्यामुळे तिला वेगळे महत्व आहे. देशात नव्हे जगात जिथे-जिथे हिंदू गेले तिथे त्यांनी शिवलिंग म्हणून नर्मदेतील ‘बाण’ नेले. आपल्याकडे ‘ नर्मदेतील गोटे’ या अर्थाने मठ्ठ लोकांना संबोधले जाते , पण शिवलिंग म्हणून नर्मदेतील लांब गोलाकार दगडाचिच पूजा केली जाते. कारण अन्य नदीतील दगडांना तो मान नाही. मात्र ‘नर्मदा के कंकर – कहलाते है शंकर’ अशी शास्त्रमान्यता. त्यामुळे नर्मदाकाठी राहणाऱ्या लोकांसाठी गंगा किंवा काशीचे विशेष आकर्षण नाही. त्यांच्या मते वर्षातून एक दिवस गंगा नदीच शुद्ध होण्यासाठी नर्मदाकाठी येते. गायीच्या रूपात. वर्षभर लोकांचे पाप शुद्ध करत गंगा मैली, म्हणजे काळी होते. नर्मदेत स्नान करताच ती काळी गाय पुनश्च गोरी होते आणि ‘शुद्धीकरणा’च्या कामाला लागते, असा लोकांचा समज. नर्मदा गंगेपेक्षा मोठी आहे, हे सांगण्यासाठी नर्मदाभक्त तिथेच थांबत नाहीत. ते म्हणतात, तुम्हाला पाप धुवायचे असतील तर गंगेत स्नान करावे लागते.
नर्मदेचं तसं नाही. नुसत्या तिच्या दर्शनाने ती तुम्हाला ‘निष्पाप’ करते. नर्मदेचे हे सारे गुण लोकमानसात इतके घट्ट रूजलेत की, लोकांनी तिला देवीचे रूप
दिले आहे. मगर जिचे वाहन आहे, अशी रूपसुंदर कुमारिका मध्यप्रांत-गुजरातेतील अनेक मंदिरात विराजमान झालेली दिसते. प्राचीन मंदिरातील तिच्या मूर्ती जितक्या सुंदर तेवढ्याच हल्लीच्या काळातील भडक, ओबडधोबड. कुठेही जा, आरती-भजनात एक प्रकारचा कर्णकटू कर्कश्शपणा. वास्तविक पाहता आठव्या शतकात ज्या शंकराचार्यांनी बौद्ध धम्माच्या प्रभावाखाली गेलेल्या भारतीयांना पुन्हा सनातन हिंदू धर्माकडे ओढले, त्या आदी शंकराचार्यांना गुरूज्ञान नर्मदा किनारी झाले होते. ओमकारेश्वरच्या खळाळत्या नर्मदेने वेढलेल्या गुहेत बसून शंकराचार्यांनी साधना केली होती. त्याच काळात ‘त्वदीय पाद पंकजम्, नमामि देवी नर्मदे’ हे नर्मदाष्टक लिहिले गेले असावे. नर्मदेच्या जलधारांप्रमाणे शंकराचार्यांचे शब्द चमचमत वाहतात, सोबत अर्थाचा धीर गंभीर नाद आणि श्रद्धेची संयत लय अहाहा.
नमामि देवी नर्मदे, जपामि देवी नर्मदे, वदामि देवी नर्मदे,
स्मरामि देवी नर्मदे…त्वदीय पाद पंकजम्, नमामि देवी नर्मदे…’
एकीकडे शंकराचार्यांना ज्ञान देणारी नर्मदा तितक्याच प्रेमाने बंडखोर कबीर महाराजांनाही सांभाळते हे नर्मदेचे आणखी एक वैशिष्ट्य. गंगेच्या किनाऱ्यावर जन्मलेल्या – वाढलेल्या कबिराला ज्ञानप्राप्तीसाठी नर्मदेचा किनारा गाठावा लागला होता. त्याची साक्ष आजही मिळते. कबिराची निर्गुणी भजनं नर्मदेच्या काठी अखंड घुमत असतात. एकतारी हाती घेऊन फिरणाऱ्या घुमक्कड जोगी-वैरागी लोकांना कबीर जगण्याचे कारण देतो आणि नर्मदामैया त्यांचे भरण-पोषण करते. होय, नर्मदेच्या काठी कुणीही माणूस उपाशी झोपत नाही असा येथील लोकांचा दृढ समज आहे. समजा खरंच कुणी जंगलात आडवाटेवर अडकला असेल तर साक्षात नर्मदामैया त्याला आईच्या मायेने जेऊ घालते. असे हजारो समज, अनुभव शेकडो पिढ्यांपासून नर्मदेकाठी रूजले आहेत. नर्मदेच्या मंदिरापेक्षा तिच्या या ‘आईपणा’मुळे लोक अजूनही तिचा पदर सोडायला तयार नसावेत.
मानले तर तीर्थ
न मानले तर पाणी
न दिसे रूप-गुण
तरी नदी असे परिपूर्ण
धावे उदक अथक
नदी माझे जीवऋण
(क्रमश:)
Leave a Reply