धाराशिव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूरग्रस्तांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. परंडा तालुक्यातील देवगाव येथे रात्री उशिरा पाहणी करण्यासाठी ते पोहोचले होते. तेथे ग्रामस्थांशी संवाद साधताना एका तरुणाने कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. यावर अजित पवार संतापले आणि त्यांनी दिलेलं उत्तर आता चर्चेचा विषय ठरत आहे.
तरुणाने कर्जमाफीबाबत प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले, “यालाच मुख्यमंत्री करा. अरे बाळा, मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतोय. जो काम करतो त्याचीच माxx .” असे म्हणत त्यांनी त्या तरुणाला झापलं. यानंतर अजित पवार पुढे म्हणाले, “सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही.” या वक्तव्यामुळे कर्जमाफीसंदर्भात त्यांची भूमिका काय आहे, हे स्पष्ट होतं.
पूरस्थितीमुळे त्रस्त शेतकरी आणि नागरिक मदतीची अपेक्षा करत असताना उपमुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेमुळे वातावरण अधिकच तापलं. उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून, पूरग्रस्तांना न्याय मिळणार की नाही, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, मंत्र्यांच्या दौऱ्यांदरम्यान नागरिकांचा रोष व्यक्त होणं नवं नाही. मात्र, अजित पवारांनी दिलेल्या उत्तरामुळे सरकारची अडचण वाढण्याची चिन्हं आहेत. पूरग्रस्तांच्या अडचणींवर तोडगा काढण्याऐवजी कर्जमाफीच्या प्रश्नाला ब्रेक लावल्याचा आरोप विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे अजित पवार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Leave a Reply