मुंबई पोलिसांनी ६० वर्षीय व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक करत व्यावसायिकाची सुखरूप सुटका केली आहे. आरोपींनी व्यावसायिकाला फसवून मुंबईत बोलावून त्याचे अपहरण केले आणि त्याच्या मुलाकडून लाखो रुपयांची खंडणी मागितली.
वाकोला पोलीस आणि झोन ८ च्या अधिकाऱ्यांनी राधेश्याम सोनी (३०), सतीश यादव (३३) आणि धर्मेंद्र रवीदास (४०) यांना अटक केली. त्यांनी गुजरातच्या कच्छ येथून २० फेब्रुवारी रोजी मुंबईत आलेल्या केशवजी चौधरी यांचे अपहरण केले. चौधरी यांना सुवर्ण व्यवसाय संधीचे आमिष दाखवत मुंबईत बोलावण्यात आले आणि तिथेच त्यांना फसवले, असे पोलिसांनी सांगितले.
२५ लाखांची पहिली मागणी, न दिल्यास ठार मारण्याची धमकी
अपहरण केल्यानंतर त्यांना भाड्याच्या एका कार्यालयात ठेवण्यात आले. आरोपींनी सांताक्रूझमध्ये वस्त्र व्यवसाय करणाऱ्या चौधरी यांच्या मुलाकडून ६८ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील २५ लाखांची पहिली रक्कम न दिल्यास वडिलांना चाकूने ठार मारण्याची धमकी दिली.चौधरी घरी न परतल्याने आणि त्यांचा फोन बंद असल्याने त्यांचा मुलगा महेश चौधरी चिंतेत पडला. सोमवारी महेशला खंडणीसाठी फोन आल्यावर त्याने तत्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तातडीने सुटका केली, आरोपी अटकेत
तक्रारीनंतर झोनल डीसीपी मनीष कलवानिया आणि वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी उपनिरीक्षक सुनील केंगार, विशाल पालांडे आणि त्यांच्या टीमला या प्रकरणाच्या तपासासाठी नेमले. तांत्रिक तपास आणि गुप्तचर माहितीच्या आधारे आरोपींना गोरेगाव येथे शोधून काढण्यात आले. बुधवारी पोलिसांनी कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आणि केशवजी चौधरी यांची सुखरूप सुटका केली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात राधेश्याम सोनी हा चौधरी यांना पाच वर्षांपूर्वी भेटला होता. चौधरी यांचा व्यवसाय चांगला सुरू असून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याची माहिती मिळाल्यावर त्याने सतीश यादव आणि धर्मेंद्र रवीदास यांच्या मदतीने त्यांचे अपहरण करून त्यांच्या मुलाकडून मोठी खंडणी उकळण्याचे कटकारस्थान रचले. सध्या तिघेही पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply