खंडवा जिल्ह्यातील छैगाव माखन परिसरातल्या कोंडावत गावात गुरुवारी सायंकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. गंगौर विसर्जनासाठी विहीर स्वच्छ करताना विषारी वायूंचा फटका बसून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल तीन तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर सर्व मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. ही घटना अशी उलगडली की, अर्जुन नावाचा एक तरुण गंगौर विसर्जनासाठी विहिरीत साफसफाईसाठी उतरला होता. पण विहिरीत साचलेल्या विषारी वायूंमुळे तो बेशुद्ध पडला आणि चिखलात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी एकामागून एक ७ जण विहिरीत उतरले, पण मृत्यूच्या विहिरीत त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.
मृत्युमुखी पडलेले आठ जीव:
• राकेश (२१), वडील – हरी पटेल
• वासुदेव (४०), वडील – आसाराम पटेल
• अर्जुन (३५), वडील – गोविंद पटेल
• गजानंद (३५), वडील – गोपाल पटेल
• मोहन (४८), वडील – मन्साराम पटेल
• अजय (२५) – मोहन पटेल यांचा मुलगा
• शरण (४०), वडील – सुखराम पटेल
• अनिल (२८), वडील – आत्माराम पटेल
सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी छैगाव माखन रुग्णालयात नेण्यात आले असून, शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रशासनाने प्रत्येक कुटुंबाला ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस, प्रशासन आणि एसडीईआरएफचे १५ सदस्यीय पथक घटनास्थळी धावून आले. दोरी व जाळीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे, सर्वात आधी विहिरीत उतरलेला अर्जुनचा मृतदेह सर्वात शेवटी सापडला. ज्या विहिरीत ही दुर्घटना घडली, त्यालगतच एक गटार आहे. गावातील सांडपाणी या विहिरीत मिसळल्याने तिचे दलदलीत रूपांतर झाले होते. संशय व्यक्त केला जात आहे की, याच साचलेल्या गाळातून विषारी वायू निर्माण झाले, ज्यामुळे आठजणांचा जीव गेला.
Leave a Reply