राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवाशांसाठी मोठी भेट; वार्षिक आणि लाईफटाईम टोल पासची सुविधा येणार!

राष्ट्रीय महामार्गांवर वारंवार प्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीय वाहनचालकांसाठी आणि खासगी वाहनधारकांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकार लवकरच “वार्षिक टोल पास” आणि “लाईफटाईम टोल पास” सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे प्रवाशांना टोल भरण्याची अडथळे टाळता येणार असून, महामार्ग प्रवास अधिक सुलभ आणि किफायतशीर होईल.

टोल पास किती खर्चिक?
या नव्या योजनेअंतर्गत, प्रवासी फक्त ₹३,००० मध्ये वार्षिक टोल पास खरेदी करून वर्षभर संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर अमर्याद प्रवास करू शकतात.
तर १५ वर्षांसाठी लाईफटाईम टोल पास ₹३०,००० मध्ये उपलब्ध होईल. यामुळे वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी हा दीर्घकालीन फायदेशीर पर्याय ठरणार आहे.

महामार्ग मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, हा प्रस्ताव रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे, खासगी कारसाठी प्रति किलोमीटर टोल दरातही सुधारणा करण्याचा विचार सरकार करत आहे, जेणेकरून प्रवाशांना अधिक दिलासा मिळेल. या योजनेसाठी कोणतेही नवीन कार्ड खरेदी करण्याची गरज नाही, कारण ही सुविधा थेट फास्टॅग मध्ये समाविष्ट केली जाणार आहे.

सध्याची टोल पास प्रणाली आणि नवीन योजनेचे फायदे
सध्या फक्त मासिक टोल पास उपलब्ध आहे, जो एका ठरावीक टोल प्लाझासाठी ₹३४० मध्ये दिला जातो. म्हणजेच, वर्षभरासाठी ही रक्कम ₹४,०८० पर्यंत जाते.
याच्या तुलनेत फक्त ₹३,००० मध्ये संपूर्ण महामार्ग नेटवर्कवर वर्षभर अमर्याद प्रवास करण्याचा पर्याय अधिक फायद्याचा आणि किफायतशीर ठरणार आहे. त्यामुळे ही योजना पूर्णतः ऐच्छिक असली तरी, अनेक प्रवाशांचा कल या पर्यायाकडे राहण्याची शक्यता आहे.

योजनेमुळे होणारे महत्त्वाचे बदल

१) महामार्ग प्रवास अधिक स्वस्त आणि सोयीस्कर होणार
२) टोल प्लाझांवरील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होणार
३) फास्टॅग वापर अधिक प्रगत आणि सुलभ होणार
४) महामार्गावरील रहदारी प्रवाह सुरळीत होणार

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *