लग्नात बिबट्याचा हैदोस! वधू-वरांनी घेतला पळ, कॅमेरामनची ‘स्पायडरमॅन’ स्टाईल उडी, पाहुण्यांची ताटं टाकून धूम

लखनौच्या बुद्धेश्वर रिंगरोडवरील एम.एम. लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नसोहळ्यात अचानक बिबट्या घुसल्याने एकच गोंधळ उडाला. जेवणाचा आस्वाद घेत असलेल्या पाहुण्यांनी घाबरून ताटं टाकली आणि जीव वाचवण्यासाठी दिसेल त्या मार्गाने पळ काढला. लग्नमंडपात शूटिंग करत असलेल्या कॅमेरामनने तर थेट ‘स्पायडरमॅन’सारखी पायऱ्यांवरून खाली उडी घेतली. वधू-वरांनीही प्रसंगावधान राखत गाडीत आसरा घेतला.
बिबट्या मंडपात शिरल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मंडप रिकामा करण्यात आला आणि पाहुण्यांनी जीव मुठीत धरून बचावासाठी गाड्यांमध्ये आश्रय घेतला. काही वेळाने बिबट्या एका घराच्या टेरेसवर बसल्याचे आढळले. मात्र, तो खाली उतरताच शोधमोहीम राबवणाऱ्या पथकासमोर थरारक दृश्य निर्माण झाले. पोलिसांना पाहताच बिबट्या जोरात डरकाळला, त्यामुळे एका अधिकाऱ्याच्या हातातील रायफल खाली कोसळली.
वर गाडीत बसून थरार पाहत राहिला
या गोंधळातच बिबट्याने इन्स्पेक्टर मुकद्दर अली यांच्या हातावर हल्ला केला आणि वेगाने लग्नमंडपाच्या पलीकडे पळ काढला. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागाच्या पथकाने अखेर बिबट्याला जेरबंद केले. मात्र, या संपूर्ण काळात वर एवढा घाबरला होता की, बिबट्या पकडला जाईपर्यंत तो गाडीतच बसून राहिला!

कॅमेरामनची धडाडी; बिबट्याला पाहताच थेट उडी
आलमबाग पुरण नगरमध्ये राहणाऱ्या अक्षय श्रीवास्तव यांचा विवाह बुद्धेश्वर रिंगरोडवरील एम.एम. लॉनमध्ये होता. रात्री ९ वाजता पाहुण्यांनी नाश्ता सुरू केला होता. त्याचवेळी दोन कॅमेरामन वधू-वरांचे शूटिंग करण्यासाठी योग्य जागेचा शोध घेत होते. अचानक बिबट्याला पाहताच एका कॅमेरामनने भीतीने थेट पायऱ्यांवरून खाली उडी मारली! दुसरा कॅमेरामन आणि वधू-वर जीव वाचवत पळाले. त्यानंतर संपूर्ण मंडपात प्रचंड गोंधळ उडाला, पाहुण्यांनी आपापली ताटं सोडून जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली.

बिबट्याचा पोलिसांवर हल्ला
रात्री १० वाजता पोलिस आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला शोधण्यासाठी संपूर्ण टीम जिन्यावरून वर जात असताना अचानक त्याने पुढे जात असलेल्या इन्स्पेक्टर मुकद्दर अली यांच्यावर झडप घातली आणि त्यांच्या हातावर गंभीर जखमा केल्या. त्यानंतर तो वेगाने लग्नमंडपाच्या बाहेर निघून गेला. वधू-वरांचे कुटुंबीय आणि पाहुणे गाडीत बसून बिबट्या पकडण्याची वाट पाहत होते. रात्री १ वाजता वधूपक्षाने सांगितले की, “बिबट्याच्या हल्ल्यामुळे आम्हाला जेवणही करता आले नाही. सारा स्वयंपाक वाया गेला.” बिबट्या पकडल्याशिवाय मंडपात परत जायची कोणाचीही इच्छा नव्हती.

थरार संपला! रात्री २ वाजता बिबट्याला पकडले
पोलिसांनी संपूर्ण परिसरात सतर्कतेच्या सूचना दिल्या. लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आणि टेरेसचे दरवाजे बंद ठेवण्यास सांगितले. अखेर रात्री २ वाजता, पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त मोहिमेनंतर बिबट्याला पकडण्यात आले. त्यानंतर लग्नसोहळा सुरू करण्यात आला. दरम्यान, घटनास्थळापासून अवघ्या १० किमी अंतरावर गेल्या तीन महिन्यांपासून वाघाची दहशत पसरली आहे. रहमानखेडा परिसरात वाघाचा वावर असल्याच्या चर्चा असून काही दिवसांपूर्वी तिथे वाघाचे ठसेही आढळले होते. सध्या पोलीस आणि वनविभागाचे पथक त्या वाघाचा शोध घेण्याच्या तयारीत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *