माहीममध्ये घरावर झाड कोसळले; वृद्ध महिला आश्चर्यकारकपणे बचावल्या

माहीम मनमाला टँक रोड (माहीम-माटुंगा दरम्यान) येथे शुक्रवारी दुपारी रस्ता दुरुस्तीच्या कामादरम्यान अचानक एक झाड उन्मळून पडले. या दुर्घटनेत पहिल्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून मोठी फांदी आत शिरली, मात्र ७५ वर्षीय नीला पारेख या सुदैवाने बचावल्या. या घटनेत त्यांचे कोणतेही शारीरिक नुकसान झाले नसले तरी, घराच्या खिडकीचे मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी दुपारी सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे एस.एल. बिल्डिंगजवळील एक झाड मुळासकट उन्मळून पडले. त्याची एक मोठी फांदी थेट पहिल्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून आत घुसली. त्या वेळी घरातील वृद्ध महिला नीला पारेख या पूजेमध्ये मग्न होत्या. घटनेबद्दल बोलताना नीला पारेख म्हणाल्या, “मी पूजा करत असताना अचानक मोठा आवाज झाला. क्षणार्धात खिडकीची काच फुटून खोलीभर पसरली. तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. मी थोडी बाजूला असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आमच्या खिडकीची ग्रिलही खराब झाली आहे. मात्र, कंत्राटदाराने तिची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे.”
घटनेची माहिती मिळताच बीएमसीच्या जी-नॉर्थ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबी यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी सांगितले, “महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून, आम्ही रस्ते विभागाला कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी झाडे उपटण्याची योग्य प्रक्रिया अवलंबण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.“या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक रहिवाशांनी “महापालिकेने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक दक्षता बाळगावी,” अशी मागणी केली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *