बीएमसीचा ‘गुणवत्ता वर्धन’ उपक्रम, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मोफत पुस्तके

मुंबई  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) ‘गुणवत्ता वर्धन’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत, पुढील वर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच अभ्यास साहित्य वितरित करण्यात आले आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाने अदानी ग्रुप आणि उत्थान ग्रुपच्या सहकार्याने एकूण ५,५४१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक अभ्यास पुस्तके दिली. मराठी, अर्ध-मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपक्रमासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी, अदानी फाउंडेशन आणि उत्थान ग्रुपच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा उपयोग करण्यात आला.
१७ फेब्रुवारी २०२५ रोजी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते बीएमसी मुख्यालयात या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी काही निवडक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रत्यक्ष पुस्तक संच प्रदान केला. या कार्यक्रमास शिक्षण उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर, प्राथमिक शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, माध्यमिक शिक्षण अधिकारी सुजाता खरे आणि उपशिक्षण अधिकारी (लोकसहभाग विभाग) मुख्तार शाह यांच्यासह अदानी इलेक्ट्रिसिटीचे प्रतिनिधी आणि अनेक अधिकारी उपस्थित होते.
डॉ. अमित सैनी यांनी शिष्यवृत्ती परीक्षांचे महत्त्व अधोरेखित करताना, या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच आत्मविश्वास निर्माण होतो आणि भविष्यात उच्च शिक्षणासाठी त्याचा उपयोग होतो, असे सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचून आपली ज्ञानसंपदा वाढवावी, असा सल्ला त्यांनी दिला.
शिक्षण उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांनी ‘गुणवत्ता वर्धन’ उपक्रमाविषयी माहिती देताना सांगितले की, राज्यभरात फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते, सहसा दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी या परीक्षा होतात.
२०२४ मध्ये इयत्ता ५ वीतील ३,५२५ आणि इयत्ता ८ वीतील ३,३६५ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६०५ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. या उपक्रमाच्या मदतीने आगामी परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना परीक्षेची अधिक चांगली तयारी करता यावी, यासाठी उन्हाळी सुट्टीत बीएमसी अतिरिक्त प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. तसेच, बीएमसीच्या शिक्षण विभागाद्वारे ऑनलाइन शिक्षणाचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील. सप्टेंबर २०२५ पासून विद्यार्थ्यांसाठी मॉक परीक्षा आयोजित करण्यात येणार असून, या परीक्षांच्या माध्यमातून सराव करून विद्यार्थ्यांना आपली कामगिरी सुधारता येणार आहे.
या उपक्रमामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास महापालिका शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *