मराठी भाषा, संतपरंपरा आणि विचारसंपन्नतेचा गौरव करणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्राच्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव केला.
“अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे विविध बोलींचे संमेलन आहे,” असे स्पष्ट करताना त्यांनी मराठी भाषेच्या जडणघडणीतील संतपरंपरेचे योगदान अधोरेखित केले. “संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांनी मराठी भाषेचे महत्त्व मांडले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी संतांनी पोषक भूमी तयार केली,” असे त्या म्हणाल्या. भाषा ही जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत भवाळकर म्हणाल्या, “भाषा ही जैविक गोष्ट असून, ती बोलली तरच जिवंत राहते. संतांनी विठ्ठलाशी संवाद मराठीतून साधला आणि त्यामुळेच ही भाषा टिकली.” मराठी भाषेच्या उगमाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “आईने ज्या दिवशी आपल्या बाळासाठी पहिली ओवी म्हटली, त्या दिवशीच मराठी भाषा जन्माला आली असावी.”
मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “मराठी बोलीतूनच शिवाजी महाराजांना मावळे मिळाले. भाषा ही संस्कृतीचे बलस्थान असते. ती आपलेपण निर्माण करणारी, जोडणारी असली पाहिजे, तोडणारी नाही.”
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी स्त्री असण्यापेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्यावे, हा संदेश देताना संपूर्ण उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. महाराष्ट्राच्या विचारधारेचे प्रतीक म्हणून पंतप्रधानांना भेट देण्यात आलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदारमतवादी संस्कृतीचे प्रतीक असल्याचेही त्यांनी सांगितले.
संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. रुक़य्या मकबूल यांच्या नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर शमीमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. अखेरीस पसायदानाने या विचारमंथनाचा समारोप झाला. या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, विनय सहस्रबुद्धे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेचा सन्मान, संतपरंपरेचा गौरव आणि प्रेमाचा संदेश दिला जावा, अशी भावना भवाळकर यांनी यावेळी व्यक्त केली.

मराठी भाषा संतांनी टिकवली, भाषा ही जोडणारी असायला हवी, डॉ. तारा भवाळकरांच्या भाषणाला मोदींसह पवारांची दाद
•
Please follow and like us:
Leave a Reply