मलबार हिल वॉकवेवर तिकीट शुल्क; आता मोफत फिरता येणार नाही

मलबार हिलवरील लाकडी जंगल वॉकवेवर चालण्यासाठी नागरिकांना लवकरच तिकीट शुल्क भरावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने देखभालीसाठी खर्च वसूल करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. तसेच, गर्दी नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रणाली बसवण्याची तयारी सुरू आहे. हा मुंबईतील पहिला जंगल वॉकवे पूर्णत्वास आला असून तो लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे. ४२७ मीटर लांब आणि २.४ मीटर रुंद असलेल्या या लाकडी वॉकवेवर एकावेळी ४१७ लोकांपेक्षा जास्त गर्दी होऊ नये, यासाठी स्वयंचलित गर्दी नियंत्रण प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.
मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या मते, या वॉकवेच्या बांधकामावर सुमारे २५ कोटी रुपये खर्च झाला असून, त्याची देखभाल खर्चिक ठरू नये यासाठी तिकीट शुल्क आकारण्याचा विचार केला जात आहे. शुल्क सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असेच ठेवले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मलबार हिल वनक्षेत्रापासून ते कमला नेहरू पार्कजवळील खडकांच्या भागापर्यंत हा वॉकवे विस्तारलेला आहे. पर्यावरणपूरक साहित्य वापरून बांधलेले हे मॉडर्न स्ट्रक्चर सिंगापूरच्या ‘फॉरेस्ट वॉक’पासून प्रेरित आहे. यामध्ये काचेचा तळ असलेला व्ह्यूइंग डेक, पक्षीनिरीक्षण क्षेत्र आणि गिरगाव चौपाटीचे सुंदर दृश्य पाहण्याची सोय असेल. मुंबई महापालिकेने हा २५ कोटींचा प्रकल्प २०२१ मध्ये टेंडरद्वारे मंजूर केला होता आणि तो मुळात जानेवारी २०२५ मध्ये सुरू होण्याचे नियोजित होते. नगरिक कार्यकर्ते अनिल गलगली यांचे मत आहे की, देखभाल खर्च वसूल करण्यासाठी शुल्क आकारणे गैर नाही. मात्र, कार्यकर्ते निखिल देसाई यांनी गर्दी नियंत्रणाच्या कारणास्तव तिकीट शुल्क योग्य असल्याचे सांगितले, मात्र ते सर्वसामान्यांसाठी परवडणारे असावे, असे स्पष्ट केले

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *