बहेलिया वाघ शिकार प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल समोर, ईडी चौकशी होणार का?

वाघांच्या शिकारीसंबंधी प्रकरणात कोट्यवधींचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. वाघांची शिकार करून त्यांची कातडी तसेच अन्य अवयव परदेशात विक्री करण्याच्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेला मिझोराम येथील संशयित या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. म्यानमारमधून भारतात पैसे आणण्याचे कार्य त्याच्या जबाबदारीत होते.दरम्यान, वाघांच्या अवयवांसाठी हवालाच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणात पैसा येत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात आता सक्तवसुली संचालनालय (ED) देखील सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.
मिझोराम येथून अटक केलेल्या आरोपीला २५ फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. हा आरोपी मिझोराममधील रहिवासी असून, म्यानमारमधून तो भारतात पैसे आणण्याचे काम करत होता. त्याच्या मोबदल्यात वाघांची कातडी आणि अन्य अवयव पोहोचवले जात होते. या व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याची शक्यता असून, चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे प्रकरण आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते, या प्रकरणाचा तपास वनखात्यातील वाघांच्या संरक्षण व संवर्धनासाठी समर्पित अधिकाऱ्यांच्या चमूने करावा. अशा अधिकाऱ्यांकडे तपास सोपविल्यास सीबीआय किंवा ईडीच्या हस्तक्षेपाची गरज भासणार नाही.
२०१३ साली मेळघाट वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाने बहेलिया वाघ शिकार प्रकरणाचा छडा लावत तब्बल १५० आरोपींना अटक केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून तपास केला होता. अशा धाडसी अधिकाऱ्यांची नियुक्ती या प्रकरणाच्या चौकशीसाठी केल्यास अधिक प्रभावी तपास होईल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, वनखात्यातील वरिष्ठ अधिकारी हे प्रकरण कितपत गांभीर्याने घेतात, यावर पुढील कारवाई अवलंबून आहे. योग्य तपास यंत्रणांना संधी मिळाल्यासच या प्रकरणाचा पर्दाफाश होईल, असे खात्यातील अधिकाऱ्यांचे मत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *