राजकीय पक्षांकडून नुकत्याच हाती घेण्यात आलेल्या सदस्य नोंदणी मोहिमेचा गैरफायदा घेत काही फसवणूक करणाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नावे मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून देतो, असे भासवून सुमारे ५०० पदाधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी दिल्लीतून एका व्यक्तीला अटक केली असून, या घोटाळ्यामागील मुख्य सूत्रधार बिहारचा असल्याचे समोर आले आहे.
भाजपने देशभरात युद्धपातळीवर सदस्य नोंदणी मोहीम राबविली असताना, शिवडी येथील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला समाजमाध्यमांवर एक संदेश आढळला. या संदेशात नमूद करण्यात आले होते की, हा संदेश सर्वसामान्य जनतेसाठी नसून भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसाठी आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात आणि कमी दरात सदस्य नोंदणी हवी असेल, तर खालील क्रमांकावर संपर्क करा. या मेसेजमध्ये एक मोबाइल क्रमांक आणि भाजपच्या नावाने बनवलेला ई-मेल आयडी देखील देण्यात आला होता.संदेशाची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर भाजपच्या वतीने असा कोणताही उपक्रम सुरू नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा प्रकार फसवणुकीचा असल्याचा संशय आल्याने संबंधित पदाधिकाऱ्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी दिल्लीतून समरजित सिंग या तरुणाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने कबूल केले की, या संपूर्ण फसवणुकीचा मुख्य सूत्रधार बिहारमधील गोलू यादव आहे. तपासादरम्यान उघड झाले की, समरजित सिंग आणि गोलू यादव यांनी मिळून सुमारे ५०० भाजप पदाधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे.
या बनावट घाऊक ऑनलाइन सदस्य नोंदणीसाठी फसवणूक करणाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांकडून घेतलेली रक्कम चार ते पाच बँक खात्यांमध्ये वळवली. पोलिसांनी ही रक्कम नेमकी किती आहे आणि प्रत्येक सदस्यासाठी किती पैसे उकळले, हे गोलू यादव आणि त्याच्या साथीदारांना अटक केल्यानंतरच स्पष्ट होईल, असे सांगितले आहे

भाजपच्या नावाने बनावट सदस्य नोंदणी; ५०० पदाधिकाऱ्यांची फसवणूक, दिल्लीतून एकाला अटक
•
Please follow and like us:
Leave a Reply