इस्लामाबाद – पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील नौशेरा भागात शुक्रवारी दुपारी नमाज पठणावेळी भीषण बॉम्बस्फोट झाला. या घटनेत किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. नमाजासाठी मोठ्या संख्येने नागरिक मशिदीत उपस्थित असताना हा हल्ला झाला. हा स्फोट आत्मघाती हल्ल्याचा भाग असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी तातडीने मदत आणि शोधमोहीम सुरू. बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी संपूर्ण परिसर नाकेबंद करून तपास सुरू केला आहे. बचावकार्याचे प्रमुख बिलाल फैझी यांनी किमान २० नागरिक गंभीर जखमी झाल्याची पुष्टी केली आहे.
नमाज पठणादरम्यान मशिदीच्या मुख्य सभागृहात स्फोट
स्फोट मशिदीच्या मुख्य सभागृहात नमाज पठण सुरू असताना झाला. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने नौशेरा भागात संचारबंदी लागू केली आहे. प्राथमिक तपासातून हा आत्मघाती हल्लाच असल्याचे संकेत मिळत असून, संपूर्ण घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याची माहिती खैबर पख्तुनख्वाचे पोलीस प्रमुख झुल्फिकार हमीद यांनी दिली.
Leave a Reply