दिल्ली : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगात रिक्त असलेली पदे त्वरित भरावीत, जेणेकरून दलितांचे हक्क आणि हितसंबंधांचे प्रभावी संरक्षण करता येईल,” अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. भारतीय जनता पक्षाच्या सरकारची दलितविरोधी मानसिकता या रिक्त पदांवरून स्पष्ट होते, असा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून सांगितले की, “दलितांच्या हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग ही घटनात्मक संस्था असून ती कमकुवत करणे हा दलितांच्या घटनात्मक आणि सामाजिक अधिकारांवर थेट हल्ला आहे
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग ही केवळ एक संस्था नसून, दलितांचे शोषण थांबवण्यासाठी व त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेली घटनात्मक यंत्रणा आहे. त्यामुळे दलितांच्या न्याय आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी या आयोगातील सर्व पदे त्वरित भरली गेली पाहिजेत,” अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.
Leave a Reply