मुंबई अग्निशमन दलाची बाजी, राष्ट्रीय स्पर्धेत ४४ पदके पटकावली

मुंबई – मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाने राष्ट्रीय स्तरावर आणखी एक मोठा पराक्रम गाजवला आहे! नवी दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय अग्निशमन सेवा क्रीडा संमेलनात मुंबई अग्निशमन दलाने आपल्या कौशल्याचा उत्तम नमुना सादर करत ४४ पदकांवर आपले नाव कोरले, त्यात तब्बल २० सुवर्णपदकांचा समावेश आहे.
संघशक्ती, जिद्द आणि उत्कृष्ट प्रशिक्षण यांचा विजय. या राष्ट्रीय स्पर्धेत मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी शारीरिक सहनशक्ती, संघभावना आणि उत्कृष्ट बचाव तंत्रांच्या जोरावर ही शानदार कामगिरी केली. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी आणि उपआयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दलाने ही उल्लेखनीय यश मिळवले. २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान नवी दिल्लीत झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आणि उपप्रमुख अग्निशमन अधिकारी डॉ. दीपक घोष यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या जवानांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.

मुंबई अग्निशमन दलाने स्पर्धेतील विविध क्रीडा आणि अग्निशमन कवायत स्पर्धांमध्ये ४४ पदके मिळवत देशभरातील संघांना मागे टाकले.

• २० सुवर्णपदके – अतुलनीय विजय!
• १४ रौप्यपदके – दमदार कामगिरी!
• १० कास्यपदके – लढाऊ जिद्दीचे प्रतीक!

या स्पर्धेत देशभरातील विविध अग्निशमन दलांचे संघ सहभागी झाले होते. अग्निशमन कवायती, बचाव कार्य, मैदानी क्रीडा आणि सहनशक्ती चाचण्यांमध्ये मुंबईच्या जवानांनी आपली क्षमता दाखवली. इतर राज्यांच्या संघांमध्ये तीव्र स्पर्धा असतानाही, मुंबई अग्निशमन दलाच्या अतिशय शिस्तबद्ध आणि कौशल्यपूर्ण प्रदर्शन करत सर्वांची मने जिंकली. मुंबई अग्निशमन दलाने या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *