मुंबई : राज्यातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत आता नियम अधिक कठोर होणार आहेत. भोंग्यांसाठी परवानगी घेणे अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे पूर्णपणे बंद ठेवावे लागणार असून, दिवसा भोंग्यांचा आवाज ५५ डेसिबलच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलिस निरीक्षकांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत राज्यातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत चिंता व्यक्त केली. अजान म्हणणे हा धार्मिक अधिकार असला तरी भोंग्यांचा वापर धार्मिक परंपरेचा भाग नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. विनापरवाना किंवा आवाजाची मर्यादा ओलांडणारे भोंगे बंद करणार का? तसेच उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही कठोर कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांना सरसकट परवानगी मिळणार नाही. परवानगीसाठी ठराविक कालावधी निश्चित केला जाईल. यामध्ये आवाजाची मर्यादा तोडल्यास परवानगी रद्द करण्यात येईल. नियमांचे पालन न केल्यास पुन्हा परवानगी दिली जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत भोंग्यांचा आवाज ५५ डेसिबलपेक्षा अधिक नसावा. रात्रीच्या वेळी भोंगे वाजवण्यास पूर्णतः बंदी आहे. दिवसा आवाजाची मर्यादा ओलांडल्यास पोलिसांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती द्यावी आणि कायदेशीर कारवाई करावी.
तसेच, प्रत्येक पोलिस ठाण्यात आवाज मोजण्याचे यंत्र देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षकांनी प्रत्येक प्रार्थनास्थळाची पाहणी करून परवानगी घेतली आहे का, याची खात्री करावी. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास परवानगी रद्द करणे, भोंगे जप्त करणे आणि कायदेशीर कारवाई करणे बंधनकारक राहील, असे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, भोंग्यांच्या नियमांचे पालन झाले नाही, तर संबंधित पोलिस निरीक्षकाला जबाबदार धरले जाईल. कारवाईत हलगर्जीपणा केल्यास त्या निरीक्षकावरच कारवाई निश्चित असेल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
Leave a Reply