गेल्या काही वर्षांत पालकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढला आहे. याच संधीचा लाभ घेत या शाळांकडून दर दोन वर्षांनी शुल्कवाढ केली जात आहे. मागील दहा वर्षांत विनाअनुदानित इंग्रजी शाळांचे शुल्क दहा पट वाढले असून, सोलापूर शहरातील इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांना दरवर्षी किमान २५,००० ते १,२५,००० रुपये मोजावे लागत आहेत.
सन २००८-०९ मध्ये सोलापूर जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या केवळ ५० शाळा होत्या. मात्र, गेल्या १६ वर्षांत या शाळांची संख्या ३२९ वर पोहोचली आहे. दरवर्षी सहा ते आठ नवीन इंग्रजी शाळा सुरू होत आहेत. याउलट, विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याने जिल्हा परिषदेच्या तब्बल ९० शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सध्या कार्यरत असलेल्या २,७७७ जिल्हा परिषद शाळांपैकी ३०० शाळांमध्ये २० हून कमी विद्यार्थी शिल्लक राहिले आहेत. गावोगावी सुरू होणाऱ्या खासगी इंग्रजी शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पालकांची वाढती महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन इंग्रजी माध्यमांच्या शाळा पायाभूत सुविधा पुरेशा असोत किंवा नसो, शुल्कवाढ करत आहेत. मागील दहा वर्षांत या शाळांचे शुल्क २०,००० रुपयांवरून थेट ८०,००० रुपयांपर्यंत वाढले आहे. विशेष म्हणजे, अशा शाळांसाठी शुल्क ठरवण्यासाठी कोणतेही प्रभावी सरकारी नियम नाहीत. शुल्क नियंत्रण समिती अस्तित्वात असली तरी ती निष्प्रभ ठरल्याचे या सततच्या शुल्कवाढीवरून स्पष्ट होते.
विनाअनुदानित इंग्रजी शाळांना दर दोन वर्षांनी १५% शुल्कवाढ करण्याची परवानगी आहे. काही शाळा भौतिक सुविधा सुधारून शुल्क वाढवतात, तर काही शाळांनी नाहक शुल्कवाढ सुरू ठेवली आहे. अशा अनावश्यक शुल्कवाढीबाबत पालकांनी शिक्षक-पालक संघाच्या बैठकीत आक्षेप नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही विद्यार्थ्याला शुल्क थकबाकीच्या कारणास्तव परीक्षेला बसू न देणे किंवा शाळेतून काढून टाकणे, असे निर्णय घेता येणार नाहीत. जर अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित शाळेवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील इंग्रजी शाळा आणि शुल्क संरचना
• एकूण इंग्रजी शाळा: ३२९
• अंदाजे प्रवेशित विद्यार्थी: १.२३ लाख
• ग्रामीण भागातील वार्षिक शुल्क: ७,००० ते ३०,००० रुपये
• शहरी भागातील वार्षिक शुल्क: २५,००० ते १,२५,००० रुपये
शिक्षण अधिकाऱ्यांनी पालकांना शुल्कवाढीविरोधात सजग राहण्याचे आणि शाळांकडून होणाऱ्या अन्यायकारक शुल्कवाढीविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
Leave a Reply