महायुती सरकारने रद्द करावा शक्तिपीठ महामार्ग, यासाठी शेतकऱ्यांनी आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून त्यांच्या भूमिकेची स्पष्टता मागणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. अधिकाऱ्यांनी शेतात मोजणीसाठी केलेल्या खुणा बुजवून टाकू आणि त्या अधिकाऱ्यांना पुन्हा शेतात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. बुधवारी मुंबईच्या आझाद मैदानात शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची!’ आणि ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द!’ या घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी मैदान सोडले नाही. या मोर्चाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील यांनी केले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोर्चात बोलताना थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केले. दानवे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात एका भाषणात शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यांनी स्वतः म्हटले होते की, ‘माझा शब्द म्हणजे शब्द’पण आता मात्र ते काहीही बोलत नाहीत.”
शिंदे यांच्या त्या भाषणाचा ध्वनिफीत यावेळी उपस्थितांना ऐकवण्यात आला. शिंदे यांनी जाहीर करूनही महामार्ग रद्द होत नाही, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदेंचं ऐकत नाहीत, असा टोला देखील दानवे यांनी लगावला.
‘महामार्ग काढा आणि निधी गोळा करा’ – जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघात केला. सरकारकडे एकाही शेतकऱ्याची शक्तिपीठ महामार्गाची मागणी नाही. तरीही हा महामार्ग सरकार का करत आहे? मागणी नसताना रस्ते काढून ‘पक्षनिधी’उभा करण्याचा हा नवीन प्रयोग आहे,” असा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, ठराविक सहा ठेकेदारांना कामं देऊन त्यांना पोसण्याचं काम महायुती सरकार करत आहे. ही साखळी मोडायची असेल, तर शेतकऱ्यांनी ठामपणे विरोध केला पाहिजे.
या मोर्चात आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी, दिलीप सोपल, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे उपस्थित होते. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था मुंबईतील कोल्हापूरच्या व्यावसायिकांनी केली होती.
अशी असमार पुढील रणनीती
1. ८ एप्रिलला लातूरमध्ये शक्तिपीठ महामार्ग विरोधात मेळावा आयोजित केला जाईल.
2. प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांना त्यांच्या भूमिकेचा जाब विचारला जाईल.
3. सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी मेळावे घेऊन जनजागृती केली जाईल.
4. सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी शेतांमध्ये काळे झेंडे फडकवले जातील.
Leave a Reply