इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा समाजातील गरीबीविषयी आपली परखड भूमिका मांडली आहे. देशातील गरीबी मोफत वस्तू वाटून नाही, तर नवोन्मेषी उद्योजकांच्या रोजगार निर्मितीमुळे संपेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत आयोजित ‘टायकॉन मुंबई-२०२५’ या कार्यक्रमात ते बोलत होते. उद्योजकांना उद्देशून त्यांनी सांगितले की, अधिकाधिक व्यवसाय उभे करा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करा. नारायण मूर्ती म्हणाले, तुमच्यापैकी प्रत्येक उद्योजक शेकडो, हजारो रोजगार निर्माण करेल आणि त्यामुळे गरिबी दूर होईल. फुकट गोष्टी देऊन गरिबी हटवता येत नाही. कोणताही देश या पद्धतीने यशस्वी झालेला नाही. नारायण मूर्ती यांनी स्पष्ट केले की, मी राजकारण किंवा प्रशासनाचा जाणकार नाही, परंतु धोरणात्मक दृष्टिकोनातून काही शिफारशी करतो. २०० युनिट मोफत वीज योजनेचा उल्लेख करत मूर्ती म्हणाले, सरकारने अशा योजनांमुळे खरंच नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होते का, हे तपासायला हवं. उदाहरणार्थ, सहा महिन्यांनंतर सर्वेक्षण करून पाहायला हवं की, या घरांतील मुलं शिक्षणात पुढे जात आहेत का? पालक शिक्षणात अधिक गुंतले आहेत का?
एआयवरही व्यक्त केली भूमिका
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संदर्भात बोलताना नारायण मूर्ती म्हणाले, “आज जे AI सोल्यूशन्स विकले जात आहेत, त्यातील अनेक जुने प्रोग्राम्स आहेत, ज्यांना नव्या नावाने सादर केलं जातं. खऱ्या अर्थाने AI म्हणजे मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग यांची शक्ती.
नारायण मूर्तींच्या या विचारांनी उद्योगविश्वात नवचैतन्य निर्माण केले आहे. त्यांच्या मते, गरिबीवर मात करण्याचा खरा मार्ग म्हणजे रोजगारनिर्मिती, जबाबदारी आणि नवोन्मेष.
Leave a Reply