प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) च्या धर्तीवर मुंबईतील गोरेगाव येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) स्थापन करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
नवी दिल्लीत सुषमा स्वराज भवन येथे आयोजित ‘वेव्हज २०२५’ या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राला ‘वेव्हज २०२५’ चे आयोजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. ही भव्य परिषद १ ते ४ मे दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने या परिषदेत विविध देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. मुंबई हे जागतिक सर्जनशील तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ची स्थापना होत आहे. केंद्र सरकारच्या ४०० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे या संस्थेच्या उभारणीस वेग मिळणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ही संस्था केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहणार नसून संपूर्ण देशातील सर्जनशील तंत्रज्ञान क्षेत्रात नवा अध्याय सुरू करेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही केवळ शैक्षणिक संस्था नसून संशोधन व नवोपक्रम केंद्र म्हणूनही ओळखली जाईल.
महाराष्ट्र सरकारने गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी साठी जागा निश्चित केली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे प्रमाणेच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी हे सर्जनशील तंत्रज्ञान शिक्षणाचे राष्ट्रीय केंद्र ठरणार आहे.
ही संस्था केवळ चित्रपट निर्मितीपुरती मर्यादित न राहता डिजिटल कंटेंट, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), अॅनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरीटेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब ३.० तंत्रज्ञानाला चालना देणार आहे.
‘वेव्हज २०२५’ परिषद ही प्रसारण, चित्रपट, अॅनिमेशन, गेमिंग, डिजिटल मीडिया, संगीत, जाहिरात, सोशल मीडिया आणि नव्या तंत्रज्ञानातील व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
या परिषदेदरम्यान गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ‘वेव्ह बाजार’, ‘वेव्ह अॅक्सिलरेटर’ आणि ‘क्रिएटोस्फीअर’ हे विशेष उपक्रम राबवले जातील. यामध्ये १०० हून अधिक देश सहभागी होणार असून, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, नवीन संधी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ची स्थापना झाल्यामुळे भारताच्या सर्जनशील तंत्रज्ञानाला जागतिक स्तरावर महत्त्व मिळेल आणि मुंबई हे ‘क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी हब’ म्हणून उदयास येईल.
Leave a Reply